पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना शनिवारी रात्री कासारवडवली पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी त्यांच्याकडून बनावट बंदूक, चाकू, मिरची पूड साहित्य जप्त केले आहे.

शोएब खान (२६), कुशाल पुजारी (१९), बालाजी कोळगिरे (१९), साहिल शेख (१९) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चारही जण काशिमीरा येथील रहिवासी आहेत.

घोडबंदर येथील गायमुख आणि ओवळा परिसरात असलेल्या सीएनजी पंपावर काही जण दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली होती. त्याआधारे, पोलिसांनी या दोन्ही पंपांवर सापळा रचला होता. दरम्यान, शोएब, कुशाल, बालाजी आणि साहिल हे चौघे ओवळा येथील पंपावर आले असता

पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता ओवळा आणि गायमुख परिसरातील सीएनजी पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.