मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून साऱ्यांचेच लक्ष ‘चातका’सारखे पावसाकडे लागले आहे. खरे म्हणजे पावसाची वर्दी पक्षी देतात. चातक आणि पावशा हे पक्षी नजरेस पडले की पाऊस येणार असे म्हटले जाते. हे पक्षी वसईतील पक्षीमित्रांना नजरेस पडले असून पाऊस लवकरच पडणार असा संदेश घेऊन ते आल्याने वसईकर सुखावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रामीण भागात आजही पावसाचा अंदाज हा निसर्गातील बदलांवरूनच वर्तवला जातो. मच्छीमार, शेतकरी, मीठ कामगार, शेतमजूर हे सगळे निसर्गातील बदलांवरूनच पावसाचे भाकीत करत असतात. पक्ष्यांच्या याच सवयीवरून पाऊस जवळ आल्याचे म्हटले जाते. वसईच्या ग्रामीण भागात ‘पेर्ते व्हा, पेर्ते व्हा’ अशी शिळा सध्या कानावर पडू लागली आहे. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना पेरणीची सूचना देणाऱ्या आणि पावसाच्या आगमनाचा संदेश देणाऱ्या पावशा पक्ष्याचे आगमन झालेले आहे. या पक्ष्याचा आकार कबुतराएवढा असून करडय़ा राखी वर्णाचा, निमुळत्या सरळ चोचीचा असून तांबूस तपकिरी रंगाची छाती असते. त्यांचे डोळे आणि चोच पिवळ्या रंगाचे असतात. स्थानिक स्थलांतरित करणारा पक्षी असून पावसाळ्यात हे पक्षी भारतात येत असल्याचे पक्षी अभ्यासक सचिन मेन यांनी सांगितले.

‘चातका’ची प्रतीक्षा थांबली

पावशा या पक्ष्याबरोबर चातक पक्ष्याचे आगमनही वसईत झाले आहे. चातक पक्ष्याची शीळ वसईतील ग्रामीण भागात कानावर पडली असल्याचे मेन म्हणाले, तसेच या पक्ष्याचे वैशिष्टय़ म्हणजे केवळ वर्षां सरींच्या थेंबावर आपले जीवन व्यतीत करणारा हा पक्षी आहे. हा पक्षी आकाराने मैनेएवढा असतो. त्याचा रंग काळा-पांढरा असून माथ्यावर हिरवट तुरा असतो. त्याचबरोबर वसईच्या ग्रामीण भागात रात्री काजवे दिसू लागले आहेत. शेतीच्या बांधांवर येणारी लाल पाखरेसुद्धा पावसाळा जवळ आल्याचे लक्षण असल्याचे पक्षीमित्रांनी सांगितले. या काळात बहुतेक पक्ष्यांचा विणीचा हंगाम असल्याने त्यांचीही लगबग या हंगामात वसईत पाहावयास मिळत आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी वसई-विरारमधील पक्षी आपापली घरटी बांधण्यात गुंतून जाताना दिसतात. परंतु चातक आणि पावशा हे दोन्ही पक्षी परभृत गणातले असून कोकीळ कुळातले आहेत. त्यामुळे हे पक्षी कधीच आपली घरटी बांधत नाहीत. दुसऱ्याच्या घरटय़ात अंडी घालतात. हे पक्षी वसईतील ग्रामीण भागातील झुडपी, जंगले, मनुष्य वस्तीजवळच्या बागा, वनराया आणि शेतीचा प्रदेश या ठिकाणी दिसून येतात. त्यातील पावशा पक्षी हा शेतकऱ्यांसाठी पेरणीचा संदेश घेऊन आला, असा समज शेतकरी करतात.

– सचिन मेन, पक्षी अभ्यासक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rainy season birds in vasai