जिल्हाधिकाऱ्यांची आरोग्य यंत्रणेला सूचना

ठाणे  :  करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत अनेक ठिकाणी तात्पुरती करोना उपचार केंद्रे सुरू करण्यात आली होती. शाळा, आश्रमशाळांमध्येही काही केंद्रे उभारण्यात आली होती. सद्य:स्थितीत शाळा सुरू झाल्याने तेथील करोना उपचार केंद्र हलविण्यात यावे आणि त्यांच्या पर्यायी व्यवस्थेचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आरोग्य यंत्रणांना दिले आहेत.

करोना केंद्रांमधील अग्निशमन यंत्रणांची तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या तसेच रुग्णालयांमध्ये पुरेसा प्राणवायू आणि औषधांचा पुरेसा साठा राखण्याच्या, त्याविषयी पुरवठादार कंपन्यांच्या संपर्कात राहून गरजेच्या वेळी हे साहित्य उपलब्ध होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्य यंत्रणेला हे सर्व निर्देश देण्यात आले आहेत. या वेळी जिल्ह्यातील रुग्णालयातील खाटांची उपलब्धता, प्राणवायूचा साठा, औषधे यांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक कैलाश पवार, जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बढे, जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणाचाही आढावा

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग कमी असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या निदर्शनास आले होते. हा वेग वाढविण्यासाठी उपाययोजना राबविण्याच्या आणि मतदारसंघ निहाय लसीकरणाचा आढावा घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना केल्या आहेत.  केंद्र शासनातर्फे १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मंजुरी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात या वयोगटाकरिता लसीकरण सत्र राबविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे साडेचार लाखाच्या घरात आहे. इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांच्या संमतीने शाळेतच लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात यावे. अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.