डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांवर सेवा वाहिन्या टाकण्यांसाठी खासगी कंपनीच्या ठेकेदारांनी खोदून ठेवले आहे. या रस्त्यांच्या कडेच्या चऱ्या बुजवून त्यावर तातडीने डांबरीकरण होणे आवश्यक आहे. या चऱ्यांमध्ये गेल्या १५ दिवसांपासून खडी टाकून ठेवण्यात आली आहे. या खडीवरून वाहनांची येजा सुरू असल्याने खडी अनेक ठिकाणी रस्त्यावर पसरली आहे.
या खडीवरून येजा करताना दुचाकी स्वार घसरून पडत आहेत. काही ठिकाणी चऱ्या सहा ते सात इंच खोल आहेत. त्या चऱ्यांमध्ये लहान टेम्पो, दुचाकीचा टायर अडकून वाहन चालकांना मनस्ताप होत आहेत. शहरातील बहुतांशी व्यापारी अंतर्गत व्यवहार टेम्पो वाहतुकीतून करतात. त्यांना या चऱ्यांचा सर्वाधिक त्रास होत आहे. या चऱ्यांमुळे वाहन हळू चालवावे लागते.
डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या ठाकुर्ली पूल, स. वा. जोशी शाळा, गणेश मंदिर रस्ता, नेहरू रस्ता, फडके रस्ता भागात चऱ्यांमध्ये खडी टाकून १५ दिवस उलटून गेले आहेत. या चऱ्या बुजून टाका असे पादचारी तेथे काम करणाऱ्या कामगारांना सांगत आहेत. खोदकाम करणारे कामगार आमचे हे काम नाही अशी उत्तरे रहिवाशांना देतात. रहिवाशांचा संताप होत आहे. अशा सेवा वाहिन्या टाकण्यासाठी खासगी कंपन्या पालिकेला शुल्क भरणा करतात. पालिकेने आपल्या यंत्रणेतर्फे चऱ्या बुजवून टाकण्याची कामे करायची आहेत.
अनेक दिवस उलटूनही रस्त्यांच्या कडेला खडी दिसत असल्याने पादचारी नाराजी व्यक्त करत आहेत. चऱ्यांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालता येत नाही. पदपथांवरून चालण्यासारखी परिस्थिती नाही. जोशी शाळेजवळ एका बाजुला टेम्पो वाहनतळ आणि दुसऱ्या बाजुला महानगर गॅस कंपनीकडून वाहिन्या टाकण्याची सुरू असलेली कामे अशा कोंडीतून वाहन चालकांना प्रवास करावा लागतो. या भागातून अनेक ज्येष्ठ नागरिक, वृध्द ९० फुटी रस्ता, रेल्वे मैदानाकडे फिरण्यासाठी जातात. त्यांना हा त्रास सहन करावा लागतो.
मानपाडा रस्त्याच्या चार रस्त्यापुढील रस्ते सीमा पट्ट्या दुतर्फा खोदून त्यावर फक्त माती लोटून ठेवण्यात आली आहे. काही ठिकाणी पेव्हेर ब्लॉक लावण्यात आले आहेत. रस्ते सुस्थितीत नसल्याने दुचाकी स्वार मुख्य रस्त्याच्या दिशेने दुचाकी उभी करून दुकानात खरेदीसाठी जातो. त्यामुळे या रस्त्यावर कोंडी होत आहे. गोग्रासवाडी वळण रस्ता, पांडुरंग विद्यालय ते शिवाजीनगर पर्यंत रस्त्याच्या दुतर्फाचे रस्ते सीमा पट्ट्यांचे काम योग्यरितीने केले नसल्याने या भागातील व्यापारी, रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
येत्या आठवड्यात शहरातील शाळा सुरू होतील. शाळांच्या बसची शहरातील वर्दळ वाढणार आहे. अशा परिस्थितीत रस्ते सुस्थितीत नसतील तर वाहन कोंडीत नव्याने भर पडणार आहे. याचे भान ठेऊन पालिका प्रशासनाने तातडीने रस्ते सुस्थितीत करण्याची मागणी शाळा चालकांनी केली आहे.
चऱ्या भरणे, डांबरीकरणाची कामे येत्या पाच दिवसातू पूर्ण केली जाणार आहेत. तसे नियोजन आहे. पावसापूर्वी ही काम पूर्ण केली जातील.-व्ही. एस. पाटील,कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग
