महाविद्यालयात होणारे सांस्कृतिक उपक्रम शिक्षणाबरोबर बाहेरील जगाचे परिपूर्ण ज्ञान देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्यामध्ये त्यांना विशेष महत्त्व आहे. महाविद्यालयात जसे विद्यार्थी घडतात तसे सांस्कृतिक उपक्रमातून कलाकार घडत जातात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि कलाकार घडवण्याचा कारखाना म्हणून त्याकडे पाहण्याची गरज आहे, असे मत ‘लोकसत्ता ठाणे’च्या ‘कट्टय़ावरची गोलमेज’ या अनौपचारिक चर्चासत्रात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या परीक्षांनंतरच्या सुटय़ांमध्ये विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असते ती नवीन वर्षांची. कॉलेजमधील नवीन शैक्षणिक वर्षांत काय करायचे, कशाकशात भाग घ्यायचा, काय टाळायचे याची गणितं मुलामुलींमध्ये येता-जाता, हिंडताफिरता होणाऱ्या गप्पांमधून आखली जात असतात. विद्यार्थ्यांची अशी मते त्यांच्याच प्रमाणे नवीन शैक्षणिक वर्षांतील घडामोडींबाबत उत्सुक असलेल्या अन्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावीत, या हेतूने ‘लोकसत्ता ठाणे’च्या माध्यमातून ‘कट्टय़ावरची गोलमेज’ हे चर्चासत्र भरवण्यात येत आहेत.
याअंतर्गत झालेल्या पहिल्या ‘गोलमेज’मध्ये महाविद्यालयांतील सांस्कृतिक जीवनावर गप्पा झाल्या. ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रतीक वाघ, ज्ञानसाधना महाविद्यालयातील उमेश भदाणे, जोशी बेडेकर महाविद्यालयातून किन्नरी जाधव, बांदोडकर महाविद्यालयाची तृप्ती शिर्के, सीएचएम महाविद्यालयाचा श्रीकांत भगत, बिर्ला महाविद्यालयाचा स्वप्निल आजगावकर, भावेश कुंटला आणि प्रणव आगाशे हे विद्यार्थी या चर्चासत्रात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास आणि पुढे जाऊन त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाचे ठरणारे सांस्कृतिक उपक्रम आणि महोत्सव महाविद्यालयांनी अधिक अग्रक्रमाने साजरे करण्याची गरज आहे, असा सूरही त्यांनी आळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चर्चासत्रातील ठळक मुद्दे
*विद्यापीठाचा ‘युथ फेस्टिव्हल’ प्रत्येक विद्यार्थापर्यंत पोहचावा.
*महोत्सवांसाठी महाविद्यालयांनी सढळ हस्ते मदत करावी.
’बाहेरील प्रयोजकत्वाला मान्यता दिल्यास महोत्सव मोठे होतील.
*प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Round table discussion on several issues