राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी युती करूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष सपाटून मार खात आहे. कल्याण-डोंबिवली व कोल्हापूर महापालिका निवडणुकीतही या पक्षाने अपयशाची परंपरा कायम ठेवली आहे.
मुंबईत राजकीयदृष्टय़ा प्रबळ असलेल्या शिवसेना व भाजपशी हातमिळवणी करून रिपाइंने मुंबई महापालिकेची निवडणूक लढविली होती. परंतु कशी तरी एक जागा जिंकता आली. त्यानंतर नवी मुंबई व औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका झाल्या. रिपाइंने नवी मुंबईत स्वबळावर निवडणूक लढविली, परंतु हाती काहीच पडले नाही. औरंगबादमध्ये भाजपशी हातमिळवणी करूनही त्याचा राजकीय फायदा झाला नाही. त्यानंतर आता कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला पराभवाचाच सामना करावा लागला.
कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपशी युती करून रिपाइंने १२ जागा लढविल्या होत्या. त्यातील पक्षाचे सहाच अधिकृत उमेदवार होते, असे सांगितले जाते. परंतु १२ जागा अधिकृत होत्या, असे पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर यांचे म्हणणे आहे. या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून शीतल गायकवाड या पक्षाच्या अधिकृत उमेदवार विजयी झाल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये भाजपने रिपाइंसाठी ६ जागा सोडल्या होत्या, मात्र एकही जागा निवडून आली नाही, अशी माहिती त्यांनी दिली. सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करूनही रिपाइंला फायदा होत नसल्याच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.