महापालिकेची जोरदार फलकबाजी
अस्वच्छता आणि प्रदूषण या कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेने डोंबिवलीत होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोंडावर हा डाग पुसून काढण्याचा निर्णय घेतला आहे. संमेलनासाठी राज्यभरातून येणाऱ्या साहित्यिक तसेच रसिक मंडळींसमोर शहराची शोभा होऊ नये, यासाठी संमेलन होत असलेल्या परिसरात पालिकेने स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावले आहेत. या निमित्ताने पालिकेने स्वच्छतेचा आभास निर्माण केला असला तरी, शहरातील अस्वच्छता लपून राहिलेली नाही.
डोंबिवलीतील सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत भरणार आहे. त्यानिमित्त या परिसराची डागडुजी, स्वच्छता, रंगरंगोटी पालिकेने पूर्ण केली आहे. क्रीडा संकुलाच्या भिंतीवर पालिकेच्या वतीने साहित्य रसिकांचे स्वागत असे चित्र रेखाटण्यात आले आहे. त्यासोबतच परिसराची स्वच्छता राखण्यात नागरिकांनी सहकार्य करावे असे फलकही भिंतींवर लावण्यात आले असल्याचे दिसून आले. या फलकांवर शौचालयांचा वापर करून रोगराईला आळा घाला, प्लॅस्टिकच्या भस्मासुराला आळा घालण्यासाठी सहकार्य करा, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण करून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका असे संदेश देण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने हे फलक लावण्यात आले आहेत.
अस्वच्छ शहर म्हणून गणना झाल्यावर पालिका अधिकाऱ्यांनी केवळ एक दिवस हाती झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविल्याचा दिखाऊपणा केला. त्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’च होती. मात्र साहित्य संमेलनानिमित्त का होईना, पालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत जाग आली असल्याचे दिसू लागले आहे. साहित्यनगरी सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात पालिकेने जागोजागी शहर स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावले असून त्यामार्फत साहित्यनगरी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. पालिकेची ही जागृती शहरात इतर ठिकाणी दिसत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
[jwplayer 5i2fQEnk]
‘क्रीडा संकुलात फिरण्यासाठी येणारे काही लोक दारूपार्टी करण्यासाठी येथे येतात, त्यांच्या बाटल्यांचा खच येथे दररोज सकाळी पडलेला असतो. तो कधी कधी उचलला जात नाही. पालिकेने अद्यापपर्यंत याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. मात्र आता साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांना येथे स्वच्छतेचे फलक लावण्याची उपरती झाली आहे.
–सारिका डोईफोडे, नागरिक
‘क्रीडा संकुलासोबतच शहरातील सर्वच परिसर स्वच्छ ठेवण्याकडे पालिका प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. केवळ फलक लावून जनजागृती करून उपयोग नाही, तर काही गोष्टी अमलात आणल्या गेल्या पाहिजेत.’
–हेमंत माने, नागरिक.
साहित्यनगरी स्वच्छ ठेवणार
साहित्यनगरी स्वच्छ ठेवण्याकडे आमचा कल राहणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी कोठेही कचरा टाकू नये, तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे या दृष्टीने हे फलक लावण्यात आले आहेत. शहरातही प्रभागांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून शहर स्वच्छ ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे काही कमतरता आहेत. नागरिकांनीही या बाबतीत सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
[jwplayer ZL8IBmbt]