ख्रिस्ती धर्माकरिता बलिदान देणारे संत गोन्सालो गार्सिया यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संत गोन्सालो गार्सिया चर्चची स्थापना १९४२ साली झाली. गासमधील भाविकांच्या अथक परीश्रमातून तयार झालेले हे चर्च भारतीय, इस्लामिक, ख्रिस्ती आणि युरोपिय स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे.
वसई भूमीतील एक सुपुत्र दशदिशांत पसरलेल्या ख्रिस्ती सभेतील एक अग्रणीय संत म्हणून गणला गेला. त्यांचे नाव संत गोन्सालो गार्सिया. ख्रिस्ती धर्माकरिता त्याने जपानमध्ये बलिदान दिले. येशू ख्रिस्ताप्रमाणे त्याला क्रुसावर खिळण्यात आले होते आणि अशा वीर पुरुषाला संत म्हणून गौरवण्यात आले तरी त्याच्या नावाने एकाही चर्चची स्थापना झाली नव्हती. गास येथे १९४२ मध्ये उभारण्यात आलेले चर्च त्यांना समर्पित करण्याचे ठरले. काही काळातच आकाशाला भिडणारी चर्चची एक इमारत उभी राहिली. या चर्चच्या मागे तितक्याच उंचीची फादर डिसोझा नावाची एक व्यक्ती हिमालयासारखी उभी होती. त्यांच्या पाठिंब्यामुळे वसईत एक दिमाखदार चर्च उभे राहिले. त्या चर्चच्या दर्शनी भागाच्या कलाकुसरीत हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती धर्माच्या कलाकुसरीचा त्रिवेणी संगम साधण्यात आला. सोपारा विभागात राहणाऱ्या मुलसलमान बांधवांना ही कलाकुसर प्यारी, हिंदू बांधवांना न्यारी तर ख्रिस्ती बांधवांना ती हवीहवीशी वाटणारी आहे.
गास विभागातील लोक पूर्वीपासून निर्मळच्या टेकडीवरील चर्चमध्ये जात असत. पावसापाण्यात बाळ गोपाळांची फार हेळसांड होई. वयस्कर मंडळींना शेता शिवारांचा प्रवास करून निर्मळ चर्चच्या टेकडीच्या पायऱ्या चढताना कसरत करावी लागे. त्यावेळी गावातच चर्च असलेले बरे असे सर्वानुमते ठरले. गावाच्या मध्यभागी असलेली एक जागा सर्वाच्या पसंतीस पडली. ५ मे १९४१ रोजी मुंबईच्या आर्च बिशपांचे प्रतिनिधी पाया भरणीसाठी खुद्द गास गावी आले. त्यांचे नाव फा. बालागेर. सर्वश्री सिलू पिरेल व बेंजामिन तुस्कान यांनी आपल्या मालकीच्या जागा देताच दुसरी मंडळीदेखील आपला खारीचा वाटा देण्यास पुढे सरसावली. सुरुवातीचे चर्च हे झोपडीवजा होते. १९४८ च्या पावसाळ्यात वसईला महाभयंकर वादळाचा तडाखा बसला त्यात हे चर्च जमीनदोस्त झाले.
वर्षांनुवर्षे जे स्वप्न लोकांनी उरी बाळगले होते ते स्वप्न खुद्द गासातल्या भाविकांच्या गावातच आकार घेऊ लागले. लोकांच्या उत्साहाला पारावर राहिला नाही. कुणी स्वकष्टाने अंग मेहनतीची कामे केली. कुणी बाजारात माल विकून वर्गणी उभी केली. कुणी मृत व्यक्तीच्या नावाने देणगी दिली. अशाप्रकारे लोकांना कळण्याच्या आगोदरच चर्चची इमारत आकार घेऊ लागली. त्याच वेळेला आलेले फादर डिसुझा यांनी लोकांची मने काबीज केली. आपल्या ओळखीच्या लोकांकडून व आपल्या नातेवाईकांकडून त्यांनी निधी गोळा केला, त्यामुळे स्थानिक लोकांचे मनोबल वाढले. लोखंडाच्या तसेच सिमेंटच्या बैलगाडय़ा चर्चच्या परिसरात येऊ लागल्या. निर्मळच्या डोंगरातील दगड तर रात्रंदिवस गोळा केले जात होते.
या चर्चमधील प्रमुख वेदीची आरास ही सुदैवाने तयारच मिळाली. मुंबईत जिथे फुले विकली जातात त्या भुलेश्वर मुक्कामी एक चर्च होते. बाजाररहाट वाढल्यामुळे व गर्दी तुफान झाल्यामुळे चर्चची शांतता कमी झाली. त्या चर्चमध्ये आजवर वापरली गेलेली वेदी गासच्या लोकांना देण्यात आली. स्थानिक कलाकाराने गोन्सालो गार्सियाचा पुतळा उभा केला. गिरीज येथील सिक्वेर बंधूंचे कसब पणाला लावले जाईल अशी ती उत्कृष्ट कलाकृती होती.
८ मार्च १९६२ रोजी या चर्चचे मोठय़ा थाटात उद्घाटन झाले. मुंबईचे आर्च बिशप व भारताचे पहिले कार्डिनल डॉ. व्हलेरियन ग्रेशस हे शुभाशीर्वाद देण्यासाठी आले. या चर्चचे शिल्पकार मो. एल. सी. डिसोझा आहेत. आज या चर्चमध्ये फा. फिलिप लोपिस हे प्रमुख धर्मगुरू असून फा. नीलेश तुस्कानो हे सहायक धर्मगुरू आहेत. आजमितीस या धर्मग्रामात ९५७ कुटुंबे असून गावाची लोकसंख्या ४०७८ आहे. या चर्चचा परिसर हिरवागार असून या ठिकाणी शाळा आहे. मुलांना शिकता यावे व त्यातून त्यांची प्रगती हा उद्देश बाळगून शाळा सुरू केली. आज विविध भागातील मुले शिक्षण घेत आहेत. येथील ख्रिस्ती बांधव आज आधुनिकतेच्या युगात भरारी घेत आहेत.