संत मदर तेरेसा चर्च , विरार
विरार हे लोकल ट्रेनचे पहिले स्टेशन. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी विरार स्टेशन उदयाला आले. त्या विभागातील अल्पभूधारक शेतकरी जोड धंदा म्हणून दुधाचा व भाजीपाल्याचा जोड धंदा करत असत. त्यांना रविवारी सकाळच्या वेळेला चर्चमध्ये जाणे शक्य नव्हते, अशा परिस्थितीत विरार व नालासोपारा या स्टेशन लगत एखाद्य भाविकाच्या घरामध्ये उपासना चाले. पण चर्चची अशी स्वतंत्र अशी इमारत नव्हती. आज मात्र विरार स्टेशनलगत पूर्वेला व पश्चिमेला अशी दोन चर्चेस उभी आहेत. पूर्वेकडचे चर्च हे डॉन बॉस्को संघाचे फदार यांच्या आधिपत्याखाली आहे. पश्चिमेकडच्या चर्चची देखभाल फादर डॉ. फिलिप वाझ हे बघतात. विरार स्टेशनला पूर्वेला प्लॅटफॉर्म नंबर आठवर चर्चगेटच्या बाजूने शेवटच्या टोकाला थेट विरार चर्चच्या प्रवेशद्वारात एक छोटे चर्च आहे. ते मदर तेरेसा यांना समर्पित करण्यात आले आहे. त्याचा उद्घाटन सोहळा आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो यांच्या हस्ते रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला. आदल्या दिवशी ३१ जानेवारी रोजी सर्व धर्मीय बांधवांनी मदर तेरेसा यांचा पुतळा विरार नगरीतील मुख्य रस्त्यावरून उत्साहाने आणला.
सुमारे २० वर्षांपूर्वी सुनीता फिलिप तुस्कानो यांनी स्वत:ची वडिलोपार्जित जमीन या चर्चच्या उभारणीसाठी उपलब्ध करून दिली. अभय राऊत या आर्किटेक्टने या चर्चचा प्लॅन तयार केला. रेमंड डिसुझा, सुरेश पाणीकर व जॉन डिमेलो यांनी स्ट्रक्चरल इंजिनीयर म्हणून कामाची देखभाल केली. नानभाट येथील जीजस कन्ट्रक्शनचे ठेकेदार जोसेफ लोपीस यांनी दिनांक १५ जानेवारी २००९ रोजी चर्चच्या उभारणीचे काम हाती घेतले. बिशप थॉमस डाबरे यांनी कोनशीला समारंभाचा आशीर्वाद विधी केला तर आर्च बिशप डॉ फेलिक्स मच्याडो यांनी या चर्चचा शिरोशिला विधी आशीर्वादित केला. सदर बांधकामासाठी फादर डॉ मायकल रूजारीओ यांनी चर्चचे बांधकाम पूर्ण केले.
जागेचा तुटवडा असल्यामुळे हे आयताकृती चर्च काहीसे खुजे राहिले आहे. आज उद्या लगतची जमीन उपलब्ध झाल्यास या चर्चचा आकार बदलण्याची शक्यता आहे. वेदीलगत मदर टेरेसाचा मार्बलचा पुतळा आहे तो खास राजस्थान वरून बनवून आणला आहे. हे या चर्चचे प्रमुख आकर्षण आहे. या चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर डॉ. फिलिप वाझ असून डॉ रमेश डिसोझा हे साहाय्यक धर्मगुरू आहेत.