सालाबादप्रमाणे ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे यांचा सत्कार आणि प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम झाला. ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालय हा कार्यक्रम न चुकता दरवर्षी साजरा करते. त्यामुळे आतापर्यंत जेवढी साहित्य संमेलने झाली, तेवढय़ा संमेलनांच्या अध्यक्षांच्या पदस्पर्शाने ठाण्याची भूमी पावन झालेली आहे. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींपासून सर्वच साहित्यिक यानिमित्ताने ठाण्यात येऊन गेले. त्याच माळेतील एक पुष्प सदानंद मोरे सरांनी गुंफले.
शहराची उंची तेथील उंच इमारतीवरून मोजता येत नाही, तर तेथील वाचनालयांच्या ‘उंची’वरून मोजली जाते. या फुटपट्टीने ठाण्याची उंची मोजायची झाली तर ती निश्चितच आसपासच्या चार शहरांपेक्षा जास्त निघेल. कारण येथे मराठी ग्रंथसंग्रहालय, नगर वाचन मंदिर आणि कळव्यातील जवाहर वाचनालय ही पुस्तकश्रीमंत वाचनालये आहेत. १०० वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या वाचनालयांचा शहराच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. बदलत्या शहरामुळे उभी राहिलेली अनेक मोठी आव्हाने अंगावर झेलत आजपर्यंत कठीण परिस्थितीत ही वाचनालये तग धरून राहिली. त्यातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा मान तीन वेळा या शहराला मिळाला. आजही अनेक कलांवत आणि लेखक, कवी ठाण्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळेच या शहरात होणाऱ्या साहित्य संमेलन अध्यक्षांच्या सत्काराला विशेष महत्त्व आहे.
मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या या परंपरेमुळे दरवर्षी एक मोठा साहित्यिक या शहरात येतो. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर चढण्याआधी तो विचारवंत ठाण्यात येऊन आपली भूमिका, विचार मांडतो. या परंपरेबाबत वाचनालयाचे कौतुकच करायला हवे. आज वाचक बदलला, त्याची वाचन आवड बदलली, ग्रंथालयासमोर नाना आव्हाने उभी राहात आहेत. तरीही त्यामध्ये खंड पडू दिला नाही. साहित्यिक रसिकांसाठी ही गोष्ट फार मोलाची आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरून दरवर्षी वाद होतात. ठाण्यातच झालेल्या साहित्य संमेलनात असेच वाद झाले. पण अध्यक्ष कोणीही असो त्याचा सत्कार ठाण्याच्या वतीने करण्यात येतो. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक वाचनालये हा उपक्रम राबवतात. त्याप्रमाणे ठाण्यातही ही परंपरा कायम आहे. आता एवढे मोठे साहित्यिक ठाण्यात येऊन गेल्यानंतर महाराष्ट्रातील वाचनालयांचे प्रश्न सुटले का, या प्रश्नाचे उत्तर शोधावे लागेल. आज राज्यातील सर्वच शहरांतील महापौरांना अधिकार कमी असले तरी त्यांना मान मोठा आहे. तो चुकवता येत नाही. तसे संमेलन अध्यक्षालाही मान मोठा असला तरी त्यांना अधिकार नाहीत. त्यामुळे एखाद्या संमेलन अध्यक्षाने ठरवले तर साहित्य विश्वातील अनेक प्रश्न तो तडीस लावू शकतो. मग ते सरकारदरबारी मांडायचे प्रश्न असोत, वा जनतेच्या न्यायालयात मांडायचे प्रश्न असोत. संमेलन अध्यक्षाने त्या प्रश्नांसाठी संघर्ष करायचे धाडस दाखवले तर कुठली व्यवस्था ते नाकारण्याचे धाडस करणार नाही. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. असो तोही प्रश्न व्यापक आहे. तो ठाण्यापुरता मर्यादित नाही. त्याची चर्चा मोठय़ा व्यासपीठावर होईल. म्हणून फक्त ठाण्यापुरतं बोलायचं झालं तर संमेलन अध्यक्षांनी या शहरातील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा कार्यान्वित केली तरी ठाणेकर धन्य होतील.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jan 2015 रोजी प्रकाशित
मुशाफिरी :मोरेसर, ठाण्यासाठी एवढंच करा!
सालाबादप्रमाणे ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे
First published on: 31-01-2015 at 01:23 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholars sadanand more appears in honor and interview program