अंबरनाथः अंबरनाथमध्ये धावत्या व्हॅनमधून शाळेचे विद्यार्थी पडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना सोमवारी घडली. शालेय विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या या व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणावर आता संताप व्यक्त होतो आहे. यात दोन लहान मुले जखमी झाली असून ही दोन्ही मुले फातिमा शाळेतील नर्सरी मधील होती. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी वाहनचालक आणि वाहनातील महिला कर्मचाऱ्यांविरूद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनंतर आता तरी खासगी आणि अवैध शालेय वाहन चालकांवर कारवाई होणार का, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पाऊले उचलणार का असा संतप्त सवाल पालक वर्गातून विचारला जातो आहे.
अंबरनाथच्या फातिमा शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन सोमवारी एक खासगी व्हॅन विमको नाक्याच्या दिशेने जात होती. नेताजी मार्केट परिसरात अचानक भरधाव व्हॅनच्या मागचा दरवाडा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी थेट रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे या व्हॅन चालकाच्या हा प्रकार लक्षातही आला नाही. त्याने तशीच व्हॅन चालवून तेथून निघून गेला. रस्त्यावर मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. हे विद्यार्थी पडले, त्यावेळी रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वाहन असते तर जीवघेणा अपघात झाला असता, असा संताप आता पालक व्यक्त करत आहेत. या घटनेत मुलांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाहन चालकासह दोन मदतनीस महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी या प्रकरणात शाळेची भूमिकाही तपासली जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अंबरनाथः अंबरनाथमध्ये धावत्या व्हॅनमधून शाळेचे विद्यार्थी पडल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना सोमवारी घडली. शालेय विद्यार्थांची वाहतूक करणाऱ्या या व्हॅन चालकाच्या बेजबाबदारपणावर आता संताप व्यक्त होतो आहे. यात दोन लहान मुले जखमी झाली असून ही दोन्ही मुले फातिमा शाळेतील नर्सरी मधील… pic.twitter.com/JbfWagvYmv
— LoksattaLive (@LoksattaLive) July 7, 2025
मात्र या प्रकारानंतर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बेकायदा आणि बेजबाबदार वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे सुरू असलेली कारवाई टाळण्यासाठी एका व्हॅन चालकाने उलट्या मार्गाने गाडी चालवत समोरून येणाऱ्या रिक्षाला धडक दिली होती. यावेळी गाडीतील विद्यार्थी जखमी झाले होते. खासगी शालेय वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मुले कोंबून भरली जातात. पैसे कमावण्यासाठी वाहनचालक विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात. त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता होते आहे.