आरोग्य विभागाचा उपक्रम; प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किशोरवयीन वयात लैंगिक शिक्षणाची शास्त्रोक्त माहिती व्हावी, या उद्देशातून महापालिका शाळेतील आठवी व नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनांच्या आहारी जाऊ नये म्हणून त्यांच्यासाठी व्यसनविरोधी विचार असा उपक्रमही राबविण्यात येणार आहे. येत्या महिन्याभरात प्रायोगिक तत्त्वावर शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.

ठाणे, कळवा तसेच मुंब्रा या शहरांमध्ये महापालिकेच्या १२६ शाळा आहेत. या शाळांमध्ये पहिली ते दहावीच्या वर्गात एकूण ३५ हजार ४२८ विद्यार्थी शिक्षण घेतात. यापैकी आठवी व नववीच्या वर्गात ४ हजार ९७५ विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना लैंगिक शिक्षण देण्यात येणार आहे. किशोरवयीन वयात मुलांना अनेक समस्या भेडसावत असतात. तसेच लैंगिक शिक्षणाबाबतही त्यांच्या मनात अनेक शंका असतात. त्यांच्या या सर्व प्रश्नांचे निरसन व्हावे आणि त्यांना लैंगिक शिक्षणाची शास्त्रोक्त माहिती मिळावी, या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ठाण्यातील इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या खासगी संस्थेमार्फत हे शिक्षण देण्यात येणार आहे. गेल्या २२ वर्षांपासून ही संस्था किशोरवयीन मुलांसाठी जिज्ञासा हा उपक्रम राबवीत आहे. हाच उपक्रम या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यासंबंधी तयार केलेल्या प्रस्तावास नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

काय आहे उपक्रम..

ठाण्यातील इनस्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आयपीएच) या खासगी संस्थेमार्फत जिज्ञासा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना कुमारवय, करियर, ताणतणाव नियोजन, नातेसंबंध, व्यसनविरोधी विचार, मूल्यशिक्षण अशा विविध विषयांचे शिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम सुरुवातील प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. ५० विद्यार्थ्यांची एक तुकडी याप्रमाणे दहा तुकडय़ा तयार करणार आहेत. म्हणजेच दहा तुकडय़ांमधील ५०० विद्यार्थ्यांना हे शिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून हा उपक्रम पुढे सुरू ठेवायचा की नाही, याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

उपक्रमाचा खर्च

प्रत्येक तुकडीला दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये दिवसाला तीन तास याप्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन आहे. एका तुकडीसाठी आठ हजार  रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार दहा तुकडय़ांकरिता ८० हजार रुपये, प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अल्पोपाहारासाठी ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. एकूणच या उपक्रमासाठी एक लाख ३० हजार रुपये खर्च येणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sex education lessons in municipal school