पोलिसांकडून सत्कार होणार; राज्याच्या महासंचालकांकडूनही कौतुक
मॉडेलिंगच्या नावाखाली तरुणींचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकरण १९ वर्षीय मुलींच्या धाडसामुळे उघडकीस आले आहे. रिंकू यादव हा आरोपी मॉडेलिंगचे आमिष दाखवून तरुणींची आर्थिक फसवणूक व लैंगिक शोषण करत होता. मॉडेलिंग करायचे आहे, असे सांगून या तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला पकडून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. तिच्या या धाडसामुळे पोलिसांकडून तिचा सत्कार करण्यात येणार आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही तिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.
नालासोपारा येथे राहणाऱ्या संदीप ऊर्फ रिंकू यादव (२५) हा आरोपी मॉडेलिंगचे काम मिळवून देतो, असे सांगून मुलींना फसवत होता. ज्या मुली त्याच्या जाळ्यात अडकायचा, त्यांच्या तो अश्लील चित्रफिती बनवून बलात्कार करायचा आणि या चित्रफिती इंटरनेटवर टाकायची धमकी देत ब्लॅकमेल करत होता. दोन मुलींच्या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांना त्याला बलात्कार, फसवणूक, सायबर अॅक्ट, पोक्सो आदी गुन्ह्यांतर्गत अटक केली आहे. परंतु हे प्रकरण समोर आले ते १९ वर्षीय मुलीच्या प्रसंगावधानामुळे. याबाबत माहिती देताना पालघरच्या पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी सांगितले की, ही १९ वर्षीय तरुणी वसईच्या एका महाविद्यालयात शिकते. तिच्या दोन मैत्रिणी रिंकू यादवच्या शिकार झाल्या होत्या. पण बदनामीपोटी आणि घाबरल्याने त्यांनी तक्रार केली नव्हती. त्यांनी आपल्या मत्रिणीशी याबाबत चर्चा केल्यानंतर तिने यादवला पकडण्याचा निर्णय घेतला. तिने यादवला संपर्क करून मलाही मॉडेल बनायचे आहे, असे सांगितले. आयतीच शिकार चालून आल्याने रिंकू खूश झाला होता. त्याने या मुलीला भेटायला बोलावले. त्यानंतर कळंब बीचवरून तो तिला गाडीतून नेत असताना लगट करू लागला. मुलीने लगेच तुळींज पोलिसांना बोलावले आणि रिंकू यादवला अटक केली. त्यानंतर दोन पीडित मुलींच्या तक्रारी नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलीशी लगट केल्याने तिच्या तक्रारीवरूनही रिंकूवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या या धाडसीपणामुळे हे सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. त्यामुळे तिचा पोलीस अधीक्षिका शारदा राऊत घरी जाऊन सत्कार करणार आहेत.ह्ण ‘पोलीस दीदी’ मोहिमेचा फायदा
पोलीस अधीक्षिका शारदा राऊत म्हणाल्या की, आम्ही पोलीस मित्र/पोलीस दिदी या मोहिमा राबवत होतो. महाविद्यालयात जाऊन पोलिसांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे मोबाइल क्रमांक दिले होते. काही अडचण असेल, काही समाजविघातक घडत असेल तर संपर्क करा, असे आवाहन केले होते. या मुलीने पोलिसांचा संपर्क क्रमांक मोबाइलमध्ये सेव्ह केला होता. त्याद्वारे पोलिसांची मदत घेऊन तिने या भामटय़ाला पकडून दिले. रिकू यादवचे वाहन चालविणारा त्याचा साथीदार आणि तो तरुणींना ज्या लॉजमध्ये घेऊन जाय़चा त्या लॉजमालकाविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी सांगितले.
पोलीस हे जनतेचे मित्र आहेत. त्यांच्या मदतीसाठी प्रतिसाद आणि पोलीस मित्र हे अॅप आम्ही सुरू केले आहे. याशिवाय आम्ही जनतेच्या दाराशी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. ही घटना म्हणजे त्याचेच फळ आहे. या तरुणीच्या धाडसाचे कौतुक आहे.
– प्रवीण दीक्षित, पोलीस महासंचालक