अनधिकृतरीत्या बळावलेले पदपथ, रस्त्याच्या दोन्ही भागांत अनधिकृतपणे वाहनांनी ठोकलेला तळ आणि तुंबलेल्या नाल्यामुळे पसरलेली दरुगधी या असुविधांमुळे हैराण झालेल्या महापालिका मुख्यालय परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने धडक कारवाई करून दिलासा दिला आहे.

सिद्धेश्वर तलावालगतची पाटील वाडी, नाल्यापलीकडची गणेशवाडी तसेच नूरी बाबा दर्गा रोड या महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेले रहिवासी उपरोक्त विविध समस्यांमुळे जेरीस आले होते. यासंदर्भातले वृत्त गुकुवारी ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने धडक कारवाई करून रस्त्यावरील अडथळे दूर केले. तसेच नियमबाह्य़ पद्धतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक उत्सवांच्या कमानी हटविल्या. या भागातील सांडपाण्याच्या नाल्याची सफाई कामही हाती घेण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.