विशेष मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांचे मनोहारी दर्शन अलीकडेच येथील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात पार पडलेल्या कार्यक्रमात घडले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आयोजित ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ या कला सोहळा कार्यक्रमात विशेष मुलांना फिनिक्स २०१५ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी राजस्थानचा नटवर सुरेला (चित्रकार), कानपूरची सरिता द्विवेदी (चित्रकार), प्रशांत बनिया (बासरी), मनश्री सोमण (गायिका), अमेय गावंड (संगीतकार), योगिता तांबे (तबला) या विशेष मुलांचा सत्कार करण्यात आला. नटवर हा एका पायाने अधू असून त्याने सुंदर अशी नटराज चित्रकृती साकारली तर दोन्ही हात गमावलेली व पायाने अपंग असलेल्या सरिताने तोंडात ब्रश धरून त्याच्या साहाय्याने वारली व मधुबनी चित्रशैली साकारली. प्रत्येकाचे आयुष्य हे बासरीसारखे असते, दिसताना अनेक छिद्र दिसतात, पण आत केवळ पोकळी असते. मात्र त्यात फुंकर घातली की सुंदर नाद तयार होतो, असा संदेश अधू असणाऱ्या प्रशांत बानिया याने आपल्या बासरी वादनातून दिला तर गायक व संगीतकार अमेय गावंड याने अपंगत्वाने खचून न जाता जीवनाला एक नवी संधी द्या, असे सांगितले. त्याने सादर केलेल्या कोकण किनारा या गाण्याला प्रेक्षकांनी उचलून धरले. दिग्दर्शक रवि जाधव यांनी या गाण्याला टाइमपास टू मध्ये ब्रेक देणार असल्याचे घोषित केले. या मुलांचे कौतुक करण्यासाठी मराठी सिने-नाटय़सृष्टीतील संतोष जुवेकर, मकरंद अनासपुरे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके हे उपस्थित होते.
विकलांगता ही शरीराने कधीही येत नाही, मनाने येते. एखादी व्यक्ती जोपर्यंत मी विकलांग आहे, असे स्वत:च्या मनाने मानत नाही तोपर्यंत ती विकलांग आहे असे ठरविण्याचा अधिकार कोणालाही नाही. या विशेष मुलांना इतरांप्रमाणेच वागणूक द्या, ते खूप पुढे जातील. असे सरिताने सांगितले, तर योगिताने प्रेक्षकांना आम्ही जर उत्तम कला सादर करतो तर आम्ही विकलांग कसे असा प्रतिसवाल केला. माझ्यातील कला हाच माझा सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, असेही तिने सांगितले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा कार्यक्रम प्रत्येकास प्रेरणा व ऊर्जा देणारा आहे, अशा शब्दात कौतुक केले. जिद्द शाळेतील मुला-मुलींनी वेगवेगळ्या ठेक्यावर तालतरंग हा कार्यक्रम सादर केला.