स्थानिकांना करावा लागत होता पाणी टंचाईचा सामना
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाण्यातील येऊर भागात गेल्या काही वर्षांत बेकायदा बांधकामे करून बंगले उभारण्याबरोबरच हाॅटेल सुरु करण्यात आले असतानाच, यातील काही ठिकाणी महापालिकेच्या जलवाहीनीतून बेकायदा नळजोडणी घेऊन चोरून पाणी वापरले जात असल्याची बाब महापालिकेच्या कारवाईतून उघड झाली आहे. पाण्याची चोरी होत असल्यामुळे येऊर गावातील स्थानिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांत अशा सुमारे ६० बेकायदा नळजोडण्या शोधून त्या तोडून टाकण्याची कारवाई केली आहे. या वृत्तास महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दुजोरा दिला आहे.

ठाण्यातील येऊरचा परिसर हा पर्यावरणदृष्या संवेदनशील म्हणून ओळ‌खला जातो. या भागात मोठ्या प्रमाणात जंगल असून त्याचबरोबर याठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येते. याशिवाय, वन्यप्राण्यांचाही वावर आहे. याठिकाणी आदिवासी बांधवाची गावे आहेत. नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेल्या या भागात गेल्या काही वर्षांत बेकायदा बांधकामे करून बंगले आणि हाॅटेलची उभारणी करण्यात आली आहे. त्याकडे महापालिका, वन विभाग आणि महसूल यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याची ओरड सातत्याने होत आहे. असे असतानाच याठिकाणी असलेल्या आदिवासी बांधवांच्या गावासाठी महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावरही बंगले आणि हाॅटेल व्यावसायिकांकडून डल्ला मारला जात असून यामुळे स्थानिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात स्थानिकांकडून महापालिकेकडे तक्रारी करण्यात येत होत्या. तसेच पालिकेच्या जलवाहीनीतून बेकायदा नळजोडणी घेऊन बंगले आणि हाॅटेलमध्ये चोरून पाणी वापरले जात असल्याचा आरोपही त्यांच्याकडून कऱण्यात येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या पथकाने येऊरमध्ये जाऊन अशा बेकायदा नळजोडण्याचा शोध सुरु केला आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६० बेकायदा नळजोडण्या आढळून आल्या असून त्या नळजोडण्या पालिकेने खंडीत केल्या आहेत. ही कारवाई अद्यापही सुरुच असल्यामुळे बेकायदा नळजोडण्यांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.