डोंबिवलीत संवाद कर्णबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी ,

वर्षातून एकदा येणाऱ्या दहीहंडी उत्सवात प्रत्येकाला उत्सवाचा आनंद घेता यावा या विचारातून कर्णबधिर, महिलांसाठी दहीहंडीचे नियोजन केले

डोंबिवलीत संवाद कर्णबधीर शाळेच्या विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी ,
कर्णबधीर शाळेच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांनी पंडित दिन दयाळ रस्त्यावर बांधण्यात आलेली दहीहंडी उत्साहाने फोडली.

डोंबिवली– येथील ठाकुरवाडीतील संवाद कर्णबधीर शाळेच्या कर्णबधीर विद्यार्थ्यांनी पंडित दिन दयाळ रस्त्यावर बांधण्यात आलेली दहीहंडी उत्साहाने फोडली. या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी नागरिकांनी आणि गोविंदा पथकांनी गर्दी केली होती. दहीहंडी फोडल्याचा उत्साह या मुलांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता.

माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे या उत्सवाचे सम्राट चौकात आयोजन केले होते. कर्णबधिर मुलां बरोबर महिलांसाठी स्वतंत्र दहीहंडी चौकात बांधण्यात आली आहे. वर्षातून एकदा येणाऱ्या दहीहंडी उत्सवात प्रत्येकाला उत्सवाचा आनंद घेता यावा या विचारातून कर्णबधिर, महिलांसाठी दहीहंडीचे नियोजन केले, असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.

कर्णबधिर शाळेतील मुले दहीहंडी फोडत असताना रिमझिम पावसाला सुरुवात झाली. गोविंदा रे गोपाळा जयघोष गोविंदा पथकांनी सुरू झाला. मुलांना आनंदाने दहीहंडी फोडता यावी म्हणून उपस्थित प्रत्येक जण काळजी घेत होता. कर्णबधिर शाळेच्या शिक्षिका, चालक यावेळी उपस्थित होते. सर्व कर्णबधिर विद्यार्थ्यांना दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे टी शर्ट देण्यात आले होते. मोठ्या कौशल्याने चार थर लावत, एकमेकाला सावरत मुलांनी दहीहंडी फोडली. एकच जल्लोष झाला. दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांचा सन्मान करुन त्यांना योग्य बक्षिस देण्यात आले. सार्वजनिक दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने कर्णबधिर शाळेतील मुले आनंदीत होती. नियमितच्या अभ्यासा बरोबर दहीहंडीसाठी थर लावण्याचा सराव त्यांचा शाळेत सुरू होता, असे शिक्षकांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Dahi Handi 2022 : दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वात मोठी हंडी फोडली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी