वागळे इस्टेटमधील धक्कादायक प्रकार; आरोपीला अटक
रस्त्यात अडवून प्रेमाची मागणी करत अश्लील हावभाव करणाऱ्या एका रोड रोमिओच्या जाचाला कंटाळून वागळे इस्टेट परिसरात राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिनाइल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यातील खासगी रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी दिनेश जाधव या तरुणाला अटक केली आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट भागातील ज्ञानेश्वरनगरमध्ये पीडित मुलगी राहत असून ती एका महाविद्यालयात विज्ञान शाखेत अकरावी इयत्तेत शिकत आहे. गेल्या महिनाभरापासून दिनेश जाधव तिला दूरध्वनी करून प्रेमाची मागणी घालायचा. शिवाय तिला भेटायला बोलवीत असे. त्याकडे ही तरुणी फारसे लक्ष देत नव्हती. त्यामुळे महाविद्यालयात जात असताना तो तिची वाट अडवायचा आणि तिला प्रेमाची मागणी घालून त्रास द्यायचा. ही तरुणी फारशी दाद देत नाही हे पाहून दिनेशचा वात्रटपणा आणखी वाढला. रस्त्यात अडवून या तरुणीला बाहेर फिरायला येण्यास सांगून अश्लील हावभाव करत तो तिचा पाठलाग करीत असे. या सततच्या जाचाला कंटाळून तिने रविवारी रात्री घरामध्ये फिनाइल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दिनेश आणि त्याचा मित्र राकेश या दोघांनी पीडित मुलीच्या भावास मारहाण केली आहे. पीडित मुलगी आणि तिच्या आईलाही त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिनेश जाधवला अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात त्याच्या मित्राचा शोध सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालेकर यांनी दिली.