बेकायदा रेतीची वाहतूक करणारा ट्रक जिल्हा प्रशासनाच्या दक्षता पथकाने मंगळवारी जप्त केला असून या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात ट्रकचालक शिवाजी वाघ याच्यासह ट्रक मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातून हा ट्रक रेतीची वाहतूक करीत होता. त्यावेळी गस्तीवर असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या रेती गट शाखेतील दक्षता पथकाने ही कारवाई केली. या ट्रकमध्ये सहा ब्रास रेतीसाठा आढळून आला.

केमिकल कंपनीतील स्फोटात एक जखमी

बदलापूर – येथील टिन्को केमिकल कंपनीत स्फोट होऊन त्यात अशोक पात्रा हा कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एमआयडीसीमध्ये टिन्को केमिकल कंपनी आहे. १५ जून रोजी या कंपनीतील कामगार अशोक पात्रा

हा कॉपर सल्फेटची गोणी वाहून नेण्याचे काम करीत होता. या गोण्यांची थप्पी लावत असताना तिथे स्फोट झाला. त्यात अशोक गंभीररीत्या जखमी झाला. कंपनीचे व्यवस्थापक सचिन पांडय़ा यांनी कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही साधन सामुग्री पुरविली नसल्याचा आरोप अशोकचा भाऊ प्रशांतने केला असून या प्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी पांडय़ाविरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदामातून ३४ लाखांचे मोबाइल चोरले

भिवंडी – येथील मोबाइल कंपनीच्या गोदामातून चोरटय़ांनी ३४ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री घडली. भिवंडी येथील मानकोली नाका भागात प्रो – कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन लिमिटेड कंपनीचे गोदाम आहे. या गोदामाची पाठीमागील भिंत तोडून चोरटय़ांनी गोदामात प्रवेश केला. त्यानंतर गोदामातून मोबाइल चोरून नेले. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.