कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने ठाण्यातील बाजारपेठा सजल्या असून मोरपंख, मुकुट, मनगटी, कमरपट्टा, वस्त्र आसन, पाळणा, बासरी या पारंपरिक वस्तूंसोबत यंदा श्रीकृष्णाच्या छबीने कपडय़ांवरही स्थान पटकावले आहे. यंदा जन्माष्टमीच्या पूजेच्या साहित्यातही वेगळेपण जाणवू लागल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा उत्सव करून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी रात्री कृष्णमूर्तीला संपूर्ण साज-शृंगार करून तिचे पूजन करण्यात येते. कृष्णाला सजविण्यासाठी ठाण्याच्या बाजारामध्ये असंख्य नव्या वस्तूचा शिरकाव झाला आहे.
आकर्षक आसन
कृष्णमूर्ती ठेवण्यासाठी बाजारात मलमल, वेलवेट, रेशमी कपडय़ांपासून तयार केलेली आसने उपलब्ध आहेत. काही आसनांमध्ये सोनेरी काठ लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर दोन्ही कडांना दोन लंबगोलाकार उश्याही ठेवण्यात आल्या आहेत. बाळकृष्णाच्या जन्माष्टमीला त्याला पाळण्यात घातले जाते. त्यामुळे पाळण्याला या काळात सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे अत्यंत आकर्षक पद्धतीने तयार केलेल्या पाळण्यांना अधिक पसंती मिळते. पाळण्यांमध्ये लाकडी पाळणे, स्टीलचे पाळणे, चांदीचे पाळणे, सोन्याचे पाळणे पाहायला मिळतात.
बासरीतही वैविध्य
कृष्ण आणि त्याची बासरी हा नेहमीच आबालवंृद्धासाठी आकर्षणाचा विषय राहिला आहे. ठाण्याच्या बाजारामध्ये सोनेरी जरीची, सोन्याचा मुलामा दिलेल्या, हिरे-माणकांनी सजवलेली, कुंदणे नक्षी केलेली, मोत्याची बासुरी बाजारात उपलब्ध आहेत. तसेच रेशमी गोंडा किंवा सोनेरी व चंदेरी बारीक साखळी असलेली बासरीही यंदा आकर्षणाचा विषय ठरली आहे. लहान लहान मूर्त्यांसाठी आकर्षक असे हिरे आणि मोतीजडित मुकुटांची बाजारात गर्दी पाहायला मिळते. त्यावर रेशमी दोऱ्याने तयार केलेले कृत्रिम मोरपीस तर खऱ्याखुऱ्या मोरपिसांनाही मागे टाकतील, असे आहेत. हे मुकुट मूर्त्यांच्या आकाराप्रमाणे कमी-अधिक करता येतात. त्याचप्रमाणे गुजराती समाजामध्ये कृष्णदेवाला फेटा घालण्याची पद्धत आहे. यामध्ये जरदोसी कपडय़ावर टिकल्यांची नक्षी केलेले फेटे, धाग्यांची नक्षी असलेले असंख्य फेटे बाजारात उपलब्ध आहे. तसेच हिरेजडित फेटे यंदा गोकुळाष्टमीचे खास आकर्षण ठरले आहे. कळसाच्या आकाराचा टोप सध्या शंृगारामध्ये अधिक भर घालण्यासाठी बाजारात आणण्यात आला आहे. कृष्णदेवाच्या गळ्यातील माळांमध्ये मोत्याची माळ, सोनेरी मण्यांची माळ, कृत्रिम फुलांची माळ तसेच हिरेजडित माळांना अधिक मागणी आहे. लहान लहान आकाराचे कमरपट्टे, हातात घालण्यासाठी मनगटी यांसारख्या आकर्षक आभूषणांचा समावेश आहे. पारंपरिक पद्धतीने झबल्यांच्या आकारचे वस्त्र तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये जरदोसी नक्षीकाम केलेले, बांधणीचे, टिकल्यांची नक्षी केलेले, कोयऱ्यांची नक्षी केलेल्या वस्त्रांचा समावेश आहे. या सर्व वस्त्रांना सोनेरी काठ लावून अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे.
