सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास कायद्याने आणलेली बंदी धुराची वलये सोडून पायदळी तुडवली जात असतानाच कोपरी पोलिसांनी ठाणे पूर्व भागात या नियमाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केले आहे. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास वाव देणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा देणारी आदेशपत्रे ठाण्याच्या पूर्वेकडील बहुतांश भागातील पानटपऱ्यांवर लावण्यात आली आहेत. तसेच सुटय़ा सिगारेट विक्रीवरही पोलिसांनी बंदी आणली आहे. मात्र, हे आदेश कोपरी परिसरातील पान टपऱ्यांपुरतीच लागू करण्यात आल्याने पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेबाबत प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.
ठाणे स्थानकाच्या बाहेरील पानटपऱ्यांवर धूम्रपान करणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. साहजिकच याचा त्रास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना होत असतो. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढण्यास बंदी असतानाही त्याचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी कोपरी पोलिसांकडे येऊ लागल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. काळबांडे यांनी सिगारेट नियमावलीवर बोट ठेवत कार्यक्षेत्रासाठी एक आदेश जारी केला. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणांवर सिगारेट ओढण्यास तसेच खुली सिगारेट विकण्यास बंदी घातली आहे. सिगारेटसंदर्भात असलेल्या नियमांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी, यासाठी सिगारेटसंबंधी असलेल्या नियमावलीच्या आधारे हा आदेश जारी करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. काळबांडे यांनी स्पष्ट केले.
पूर्व भागातील गांधीनगर, आनंदनगर, सिद्घार्थनगर, शांतीनगर, ठाणेकरवाडी, हासिजा कॉर्नर, भाजी मार्केट, रेल्वे स्टेशन परिसर, साईनाथनगर, पारशीवाडी, कुंभारवाडा, वाल्मीकीनगर, सावरकरनगर, मस्ताननगर, अष्टविनायक चौक, कोपरीगाव, चेंदणी कोळीवाडा, फटाका मार्केट, धोबीघाट, आनंद सिनेमा, पै गल्ली, गावदेवी मंदिर तसेच अन्य भागांतील पानटपरी व सिगारेट विक्रीच्या दुकानांकरिता हा आदेश लागू करण्यात आला आहे. शहरात अन्यत्र मात्र पानटपऱ्यांच्या बाहेर सर्रास धूम्रपान सुरू असते. त्यामुळे पोलिसांनी चालवलेली
कायद्यातील नियमाची अंमलबजावणी केवळ पूर्वेकडेच का, असा सवाल आता विचारण्यात
येत आहे.
दुकानदारांवर कारवाई
पानटपरी किंवा दुकानावर कोणीही सिगारेट सेवन करणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी दुकानदारांना केले आहे. तसेच एखादा व्यक्ती पानटपरी आणि दुकानांवर सिगारेट ओढताना आढळून आला तर संबंधित दुकानदाराला जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय, सिगारेटची खुली विक्री करू नका, बंद पॉकेटमध्येच विक्री करावी, असे आदेशामध्ये म्हटले आहे.