ठाणे : जिल्ह्यातील विविध शहरांमधील करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात जिल्ह्यात १०० ते १५० बाधित रुग्ण आढळून येत होते. तर मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात प्रतिदिन ५० ते ७० बाधित रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या आठवडय़ाच्या प्रारंभी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ही दोन हजारांच्या घरात होती. सध्या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ७९० इतकी आहे. आठवडाभरातच सक्रिय रुग्णांची संख्या निम्म्यावर आली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे प्रतिदिन देण्यात येणाऱ्या करोना रुग्णांच्या अहवालातून रुग्णांच्या मृत्यू संख्येतही काही अंशी घट झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून करोना रुग्णांच्या संख्येत अगदी झपाटय़ाने वाढ झाली होती. करोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे अनेक उपायोजना राबविल्या गेल्या. लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली होती. तसेच पंधरा ते अठरा वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लसीकरण सत्र अद्यापही राबविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ही ७९० इतकी आहे. यापैकी ९२ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित ६९८ करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याने त्यांचे जिल्हा आरोग्य विभागातर्फे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी केले आहे.
रुग्ण मृत्यूच्या प्रमाणही घट
मागील दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील पालिका क्षेत्रांमध्ये २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावरून जिल्ह्यात प्रतिदिन दोन रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. तर दोन आठवडय़ांपूर्वी जिल्ह्यात प्रतिदिन पाच ते सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद केली जात होती. यामुळे जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्येमध्ये घट होण्याबरोबरच रुग्ण मृत्यूचा दर देखील निम्म्यावर आल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.