ठाण्यातील अनधिकृत बारवर पालिकेची धडक; नौपाडय़ातील तीन, उपवनमधील एका बारचे पाडकाम
गेल्या वर्षी केलेल्या कडक कारवाईनंतरही ठाण्यात छुप्या पद्धतीने लेडीज बार पुन्हा सुरू झाल्याच्या तक्रारी येताच महापालिका प्रशासनाने बुधवारपासून अशा अनधिकृत बारना धडक देण्यास सुरुवात केली. तीन दिवसांत हे अनधिकृत बार जमीनदोस्त करण्याच्या सूचना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार बुधवारी पहिल्याच दिवशी चार ठिकाणी महापालिका प्रशासनाने कारवाई केली. त्यात नौपाडय़ातील तीन आणि उपवन येथील एका बारमधील अनधिकृत बांधकाम तोडले.
शहरातील अनधिकृत लेडीज बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर यांच्याविरुद्ध महापालिका प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली आहे. बुधवारी नौपाडा प्रभाग समितीमधील शिल्पा, अँटीक पॅलेस, पुष्पा विहार तर उपवन येथील सूर संगीत बारवर कारवाई करण्यात आली. तसेच कोठारी कम्पाऊंडमधील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सना अग्निशमन विभाग, शहर विकास विभाग आणि ३७६(अ) अन्वये नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली.
बुधवारी सकाळपासून पोलीस बंदोबस्तात आराधना टॉकीजसमोरील तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम असलेल्या शिल्पा बारवर कारवाई करण्यात आली. या वेळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने शिल्पा बारमधील बेकायदा करण्यात आलेले त्याचप्रमाणे अंतर्गत बदल करून केलेले बांधकामही तोडून टाकण्यात आले. त्यानंतर तीन पेट्रोलपंप येथील बहुचर्चित अँटीक पॅलेस बारवर अतिक्रमण विभागाने आपला मोर्चा वळविला. तळ अधिक १ मजली बांधकाम असलेल्या या बारमधील कारवाईत टेरेसवर बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड आणि अंतर्गत फेरबदल करून मोठय़ा प्रमाणात करण्यात आलेले सर्व बांधकाम, फर्निचर तोडून टाकण्यात आले. त्याचबरोबर वंदना टॉकीज येथील पुष्पा विहार बारवर कारवाई करून विनापरवाना केलेले अंतर्गत बांधकाम तोडण्यात आले. दरम्यान, अमली पदार्थ विक्रीचे अड्डे बनत असलेल्या कोठारी कम्पाऊंडमधील अनधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लर्सना नोटीस देण्याची कार्यवाही करण्यात आली. त्याचबरोबर उपवन येथील सूर संगीत बारवरही कारवाई करण्यात आली. पुढील आणखी दोन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उपायुक्त संदीप माळवी आणि उपायुक्त अशोक बुरपुल्ले, साहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड, डॉ. चारुशीला पंडित यांनी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पाडली.