डोंबिवली : एकदिशा मार्गातून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराच्या दुचाकीचा वाहन क्रमांक वाहतूक पोलिसाने मोबाइलमध्ये छबीद्वारे टिपला. याचा राग दुचाकीस्वाराला आला. त्याने दुचाकी उभी करून वाहतूक पोलिसाला वाहन क्रमांकाची छबी का टिपली, असे विचारत मारहाण केली. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपीला पोलिसांनी अटक केली.
डोंबिवली पूर्वेतील मंजुनाथ शाळेजवळ वाहतूक पोलीस शंकर कडू आपल्या सहकाऱ्यांसह वाहतुकीचे नियोजन करीत होते. त्याचवेळी मशाल चौकातून पेंडसेनगरकडे देवरत नाडार (२४) हा दुचाकीवरून एक दिशा मार्ग असताना विरुद्ध दिशेने चालला होता. कडू यांनी त्यांना एकदिशा मार्गातून जाऊ नये अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. त्यानंतरही नाडार वेगाने दुचाकी घेऊन पुढे गेला. तेवढय़ात वाहतूक पोलिसाने त्याला दंडात्मक कारवाई म्हणून ई-चलन फाडण्यासाठी त्याच्या दुचाकीच्या वाहनावरील क्रमांकाची मोबाइलमधून छबी काढली. त्याचा राग येऊन नाडारने दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली.
वाहतूक पोलीस कडू यांना आपल्या वाहनाचा क्रमांक का टिपला, असे प्रश्न करून कडू यांच्या अंगावर धावून गेला. तसेच त्यांना मारहाणही करण्यात आली. याप्रकरणी कडू यांनी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या आदेशावरून पोलिसांनी देवरत नाडार याला अटक केली.