अंबरनाथमधील युनिट रन या शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या उपाहारगृहात सुमारे १ लाख ९५ हजार रुपयांची शनिवारी रात्री चोरी झाली. विशेष म्हणजे यावेळी या उपाहारगृहातील सीसीटीव्हीची माहिती साठविण्यात येणारे डीव्हीआर आणि येथील संगणकाची हार्ड डिस्कही चोरीला गेल्याचे समजते.
अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या शस्त्रनिर्मिती कारखान्याच्या आवारात चोरी झाल्याने येथे खळबळ उडाली आहे. या फॅक्टरीच्या आवारात असलेल्या युनिट रन या उपाहारगृहातील दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून चोरटय़ाने प्रवेश केला. यावेळी उपहारगृहात असलेले १ लाख ९६ हजार २७८ रूपये चोरीला गेले. येथे असलेल्या सिसीटीव्हीची माहिती साठविण्यात येणारे डीव्हीआर आणि येथील संगणकाची हार्ड डिस्कही या चोरली आहे. त्यामुळे स्थानिकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असला, तरी याबाबत अद्याप अधिकृत सुत्रांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र, सुरक्षा यंत्रणा भेदून पुन्हा एकदा चोरीची घटना घडल्याने केंद्रीय संरक्षण खात्याच्या या कारखान्यातील सुरक्षा यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी या २०० पिस्तुलांची चोरी झाल्याची घटना घडली होती. अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.