महिलांना सुरक्षा देण्यास असमर्थ असल्याची कबुली; प्रत्येक रेल्वे स्थानकात केवळ दोन पोलीस
ऋतुजा नाईक या तरुणीला झालेल्या मारहाणीनंतर महिला तसेच एकूणच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे; परंतु वसई रेल्वे पोलिसांकडे असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे सुरक्षा पुरविण्यास असमर्थ असल्याची कबुली रेल्वे पोलिसांनी दिली आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकात केवळ जेमतेम दोन पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असतात.
वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मीरा रोड ते वैतरणा रेल्वे स्थानकांदरम्यांची आठ रेल्वे स्थानके येतात. मात्र रेल्वे पोलिसांकडे अत्यंत कमी मनुष्यबळ आहे. सध्या या पोलीस ठाण्यात १ पोलीस निरीक्षक, ३ पोलीस उपनिरीक्षक आणि १४१ पोलीस कर्मचारी एवढा ताफा आहे. तब्बल ५० टक्के कर्मचारी कमी आहेत. यापैकी काही जण कार्यालयीन कामे, न्यायालयाची कामे, समन्स बजावणे आदी कामात व्यग्र असतात. दररोज रात्री साडेआठ ते सकाळी साडेसात या काळात महिलांच्या डब्यात प्रत्येकी तीन पोलीस बंदोबस्ताला द्यावे लागतात. या काळात एकूण ११ गाडय़ा असल्याने ३३ पोलीस रात्रीच्या बंदोबस्तात व्यग्र असतात. त्यामुळे जेमतेम २५ पोलीस कर्मचारी उपलब्ध राहतात. त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकात दोन पोलीसही बंदोबस्ताला देणे शक्य होत नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांनी सांगितले. अतिरिक्त रेल्वे कर्मचारी देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच देण्यात आला आहे. मात्र अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही.
सहा महिन्यांत कारवाई नाही
रेल्वे पोलिसांनी जागा अडविणारे तसेच भजनी मंडळीविरोधात गेल्या सहा महिन्यांत कारवाई केलेली नाही; परंतु गोंधळ घालणारे, असभ्य वर्तन करणारे तसेच स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई केल्याचे बागवे यांनी सांगितले. १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०१६ या कालावधीत असभ्य वर्तन करणे तसेच गोंधळ घालणाऱ्या १६९, स्टंट करणाऱ्या ३० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय रेल्वे स्थानक परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या ४७ महिलांवर कारवाई करण्यात आली आहे.
सर्व स्तरांतून संताप
ऋतुजा नाईक या महाविद्यालयीन तरुणीला झालेल्या मारहाणीचा सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत आहे. महिला प्रवाशांचीही गुंडगिरी असते. या महिला इतर सर्वसामान्य महिलांशी अरेरावी करतात आणि वेळ प्रसंगी हातही उचलतात. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे, अशी भावना महिला प्रवाशांनी व्यक्त केली. अनेकांनी ऋतुजाच्या धाडसाचे कौतुक केले असून या महिलांना धडा शिकविल्याबद्दल तिचे अभिनंदनही केले आहे.
कोणी कुठल्या ट्रेनमध्ये चढायचे हे या गुंड प्रवृत्तीच्या महिला कसे ठरवू शकतात? या महिला जागा अडवतात. इतर महिलांना बसायला देत नाहीत. काही महिलांचे पाय दुखतात, त्यांना कमरेचा त्रास असतो तरी त्यांना बसायला देत नाहीत. यांचा बंदोबस्त व्हाययला हवा.
– ज्योती कुडू, विरार
महिलांच्या डब्यातील गुंडगिरीचा त्रास कमालीचा वाढलेला आहे. नालासोपाऱ्यातून या महिला विरारला बसून येतात. त्यामुळे विरारच्या महिलांना बसायला मिळत नाही. ऋतुजाबरोबर काहीही विपरीत घडू शकले असते. पोलिसांनी या समस्येवर त्वरित आळा घालायला हवा.
– सीमा काळे, विरार
समाजमाध्यमांतही उग्र प्रतिक्रिया
जागा अडविणाऱ्या प्रवाशांच्या अरेरावीचा अनुभव दररोज येत असतो. या प्रवाशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
– रोशन ठाकूर
या महिलांचे फोटो फेसबुकवर टाकून त्यांचे चेहरे समोर आणा.
– नितीन पाटील
दादागिरी करणाऱ्या महिलांना धडा शिकविण्याची हो योग्य वेळ आहे आपण सर्वानी ऋुतुजाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
– चार्ल्स अॅलेक्स