उषा उत्थप यांच्या दमदार सादरीकरणाने रसिक बेधुंद; हजारो रसिकांनी धरला ताल..

‘दम मारो दम’पासून ‘ढगाला लागली कळ’पर्यंत एकापेक्षा एक सरस ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यांचे अक्षरश: वादळ घेऊन आलेल्या ज्येष्ठ पाश्र्वगायिका उषा उत्थप यांनी त्यांच्या दमदार आवाजाने शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी उपस्थित हजारो रसिकांची मने जिंकली.

हिंदी, मराठी भाषांसह तामिळ, मल्याळम, पंजाबी आणि बंगाली भाषेतून आपली लोकप्रिय गाणी सादर करीत उषा उत्थप यांनी श्रोत्यांना आपल्या प्रत्येक गाण्यावर ताल धरायला लावला. त्यांच्या गाण्यांचा ठेका इतका बेमालूम होता, की प्रेक्षकांपैकी अनेकांना उभे राहून नाचण्याचा मोह आवरला नाही. महिलांनी त्यातही विशेषत: तरुणींनी त्यांच्या गाण्याला जोरदार दाद दिली. जाने जा.ढुंढता फिर रहा, दुनिया में लोगो को धोखा कभी हो जाता है, दोस्तो से प्यार किया, प्यार करनेवाले प्यार करते है शान से, रंभा हो, देखा ना हाय रे सोचा ना..डॉन ते थेट हरी ओम हरी.. अशा अनेक डिस्को गीतांचे वादळच त्यांनी रंगमंचावर आणले.

अंबरनाथ येथे रंगलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि लोकसत्ता प्रस्तुत शिवमंदिर आर्ट्स फेस्टिव्हलची अशा रीतीने शानदार सुरुवात झाली. उषा उत्थप यांनी त्यांच्या पहाडी आवाजात हिंदी, मराठी, इंग्रजी, बंगाली, तामिळ, पंजाबी अशा विविध भाषांतील गाणी सादर केली. आय लव्ह म्युझिक या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे स्कायफॉल, बॅंग बॅंग अशा इंग्रजी गाण्यांनी मैफल रंगत गेली. रसिकांनाही त्यांनी त्यांच्या सादरीकरणात सामील करून घेतले.