घनकचरा प्रकल्पाविरोधात उत्तनवासियांचा इशारा; महापालिका उच्च न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा आरोप

उत्तन येथील घनकचरा प्रकल्प स्थलांतर करण्याबाबत महापालिका उच्च न्यायालयाची दिशाभूल करून वेळकाढूपणा करत असेल तर पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यावाचून पर्याय नसल्याचा निर्धार उत्तन आणि आसपासच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. प्रकल्प वसई तालुक्यातल्या सकवार येथे १८ महिन्यांच्या कालावधीत स्थलांतर करण्याचे शपथपत्र मीरा-भाईंदर महानगरपालिकेने राष्ट्रीय हरित लवाद तसेच उच्च न्यायालयाला लिहून दिले आहे. मात्र यातील सहा महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला तरी प्रकल्प स्थलांतरित होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत.

प्रकल्पातून येणाऱ्या दरुगधीविरोधात आणि कचऱ्याला वारंवार आग लागून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या मुद्दय़ावर संघर्ष समितीने न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयीन लढाईचा आढावा घेण्यासाठी ग्रामस्थांनी नुकतीच एक बैठक आयाजित केली होती. या बैठकीला संघर्ष समितीच्या सदस्यांसह उत्तन व आसपासच्या गावातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान प्रत्येक वेळी महापालिका नवीन मुद्दा उपस्थित करत आहे, असा आरोप या वेळी ग्रामस्थांनी केला. महापालिकेने उत्तन येथील प्रकल्प वसई तालुक्यातील सकवार येथे १८ महिन्यांत स्थलांतर करण्यात येईल, असे शपथपत्र न्यायालयात लिहून दिले आहे. मात्र या कालावधीतील सहा महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी ही जागा महापालिकेच्या नावावरही झालेली नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी प्रकल्प स्थलांतर करण्याबाबत सुरू असलेल्या थातुरमातुर कारवाईची न्यायालयाला माहिती देऊन महापालिका न्यायालयाची दिशाभूल करत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

महापालिकेकडून वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिण्यात येत असल्याने संघर्ष समितीने आपली न्यायालयीन लढाई सुरू ठेवावी मात्र वेळ आल्यास ग्रामस्थ प्रकल्पाविरोधात पुन्हा आंदोलन उभे करतील, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.