डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रयत्नांना यश
राज्यातील विविध भागांत तीव्र दुष्काळ झळांमुळे सर्वसामान्य अक्षरश: हैराण झाले आहेत. त्यामुळे शासनासह सामाजिक संस्था आणि संघटनांनीही जल संवर्धनाच्या कामात गेल्या काही काळापासून झोकून घेतले आहे. या कामांची फळे आता मिळू लागली आहेत. वांगणी येथील अर्धा एकर परिसरात पसरलेल्या तलावाची स्वच्छता करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हाती घेतले आहे. हे काम सुरू असताना तलावाला पाझर फुटल्याने वांगणीकरांसाठी एक नवा जलस्रोत निर्माण झाला आहे.
निसर्ग रक्षणासोबतच स्वच्छ भारत अभियान यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची यापूर्वीच स्वच्छता दूत म्हणून निवड केली आहे. स्वच्छता मोहीम यशस्वीरीत्या राबविल्यानंतर प्रतिष्ठानने गेल्या काही महिन्यांपासून जलसंवर्धनासाठी विविध कामे सुरू केली आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून वांगणी येथील अर्धा एकर क्षेत्रफळात पसरलेल्या तलावातील गाळ काढण्यासाठी गेल्या दोन आठवडय़ांपासून संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला होता. या तलावाच्या माध्यमातून वांगणी परिसरात मोठा जलस्रोत निर्माण होऊ शकेल, असा दावा जलतज्ज्ञांनी केला होता. त्यानुसार संस्थेचे सुमारे ११०० हून अधिक सदस्य या तलावातील गाळ काढण्याच्या कामात स्वत:ला जुंपून घेतले होते. दोन आठवडय़ांत या तलावातून ५०० टन इतका प्रचंड गाळ काढण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. हा गाळ काढताच कोरडा ठाक पडलेल्या या तलावाला पाझर फुटल्याचे चित्र दिसत आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी तसेच आसपासच्या अनेक गावांमधील प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या मोहिमेत भाग घेतला होता.