ठाणे : ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि लेखिका ललिता ताम्हणे यांचे शनिवारी ठाण्यातकर्करोगाने निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती विधिज्ञ विनीत रणदिवे, मुलगी सोनल आणि तीन बहिणी असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी ललिता ताम्हणे यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. कर्करोगाशी लढतानाही त्यांनी लेखनप्रपंच सुरू ठेवला होता. परंतु शनिवारी त्यांची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. ललिता ताम्हणे यांनी ‘चित्रानंद’ मासिकातून सिनेपत्रकारितेला सुरुवात केली. त्या वेळची सिनेपत्रकारिता ही केवळ कलाकारांच्या गॉसिप स्वरूपाच्या बातम्या देण्यापुरती मर्यादित होती. मात्र ललिता ताम्हणे यांनी या क्षेत्रात पदार्पणापासूनच वास्तव आणि सत्य घडामोडींवर लिखाण केले आणि आपला वेगळा ठसा उमटवला. ‘चित्रानंद’नंतर त्या विद्याधर गोखले यांच्या ‘चित्ररंग’मध्ये मुक्त पत्रकार म्हणून लिहू लागल्या. त्यानंतर त्यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘लोकमुद्रा’ पुरवणीचे संपादन केले. वृत्तपत्रातील नोकरी सोडल्यावर त्या प्रसाद महाडकर यांच्या ‘जीवनगाणी’ या संस्थेशी जोडल्या गेल्या. त्यांनी लिहिलेल्या ‘स्मिता, स्मित, मी स्मिता पाटील’, ‘नूतन’, ‘तें’ची ‘प्रिया प्रिया तेंडुलकर’ या पुस्तकांना वाचकांची पसंती मिळाली. त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.
संग्रहित लेख, दिनांक 31st May 2020 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ सिने पत्रकार ललिता ताम्हणे यांचे निधन
कर्करोगाशी लढतानाही त्यांनी लेखनप्रपंच सुरू ठेवला होता.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 31-05-2020 at 03:18 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran cine journalist lalita tamhane passes away zws