ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रात वाढत असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत सातत्याने तक्रारी येत असतानाही दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेने कारवाईत टाळाटाळ करण्यासाठी आता नवी शक्कल शोधली आहे. बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करण्याऐवजी वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. या जाहिरातीमुळे बेकायदा बांधकामे कमी होण्याऐवजी भूमाफिया अधिक सावधपणे आपली दुष्कृत्ये करतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
ठाणे पालिका क्षेत्रामध्ये करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली होती. यावरून टीका होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी या बांधकामांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर काही काळ बेकायदा बांधकाम करणारे भूमाफिया भूमिगत झाले होते. मात्र, ही मोहीम थंडावताच भूमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून मुंब्रा, कळवा, दिवा, ठाणे अशा सर्वच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बेकायदा इमारतींची उभारणी सुरू झाली आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर काही बांधकामांवर कारवाई केल्याचे दाखवण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादानेच बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. आ. संजय केळकर यांनीही बेकायदा बांधकामाचा पुराव्याचा पेनड्राइव्ह प्रशासनाला दिला होता. त्यात बेकायदा बांधकामांची यादी आणि छायाचित्रांचा समावेश होता. या घडामोडींनंतर महापालिका प्रशासनाने बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई करत असल्याचा देखावा निर्माण करण्यासाठी वृत्तपत्रांत जाहिरात दिल्याचे बोलले जत आहे.
यासंदर्भात पालिकेने दिलेल्या जाहिरातीतच अतिक्रमणे तसेच अनधिकृत बांधकामे यांवर थेट कारवाईचा पालिकेला अधिकार असल्याचे म्हटले आहे. अशी बांधकामे निष्कासित करण्यात येतील, असा इशाराही दिला आहे. ‘ठाणे पालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येते. परंतु अशा बांधकामांमध्ये घर घेऊन नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून ही जाहिरात दिली आहे.,’ असे महापालिकेचे उपायुक्त जी. जी. गोदापुरे यांनी म्हटले आहे.
महानगरपालिकेचा इशारा
ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये काही व्यक्ती, संस्था आणि विकासक हे महापालिकेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता बेकायदेशीरपणे अनधिकृत बांधकाम करीत असल्याची बाब पालिकेच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येत आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे करणे हा गुन्हा आहे. अशा अनधिकृत बांधकामांचे छायाचित्र आणि पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले असून ही अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यासाठी कायदेशीर नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दरम्यान, काही व्यक्ती, संस्था आणि विकासक हे अनधिकृत बांधकामे करून त्यातील घरांची गैरमार्गाने खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात. असे व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा प्रकारची बांधकामे करणे, अनधिकृत बांधकामांचा व्यवहार करणे, अशा अनधिकृत बांधकामांमध्ये वास्तव्य करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा अनधिकृत बांधकामांसंदर्भात भविष्यात महापालिकेकडून कायदेशीर कारवाई पूर्ण करून ती निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येऊ शकते. तसेच मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल असलेल्या याचिकेमध्ये अशा प्रकारची अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जाहिरातीत म्हटले आहे.