सूर्या प्रकल्पाचा पाणीपुरवठा सुरू, मात्र नळजोडण्या नाहीत

सूर्या प्रकल्पाचा पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी पालिकेकडून नळजोडण्यास देण्यास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे वसई-विरार शहराला पाणी मिळाले असले तरी त्याचा रहिवाशांना उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. नळजोडण्या देण्याचे शेकडो अर्ज महापालिकेकडे प्रलंबित आहेत.  महापालिकेने मात्र लवकरच नळजोडण्या देण्याचे काम सुरू केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

सूर्या पाणी प्रकल्पाची ३०० कोटी रुपयांची योजना पूर्ण झाली असून असून त्याद्वारे वसई-विरार शहराला १०० दशलक्ष लिटर्स पाणी मिळणार आहे. सध्या शहराला सूर्याच्या पहिल्या टप्प्यातील १०० दशलक्ष लिटर, उसगाव पापडखिंड, पेल्हार आणि १३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. अतिरिक्त शंभर दशलक्ष लिटर पाणी आल्याने नागरिकांना एकूण २३१ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे, परंतु अद्याप नवीन नळजोडण्या देण्याचा निर्णय न झाल्याने नागरिकांना पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे. नळजोडण्या मागणारे हजारो अर्ज सध्या प्रलंबित आहेत.

सूर्या टप्पा क्रमांक तीनचे पाणी शहरात आल्यानंतर त्याचे वितरण होणे गरजेचे होते. वितरणाची व्यवस्था झाली नसती तर शहर तहानलेलेच राहिले असते. यासाठी वसई-विरार महापालिकेने १३६ कोटींची अमृत योजना मंजूर करून घेतली. त्या योजनेंतर्गत शहरात २१ ठिकाणी मोठे जलकुंभ उभारले असून ३१० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी पाण्याचा दाब असमतोल होता. तो तपासून सर्व जलवाहिन्यांतून पाणी समान दाबाने जाईल याची खात्री करून घेण्यात आली. सुरुवातील ५० दशलक्ष लिटर पाणी नागरिकांना मिळणार आहे आणि त्यांनतर टप्प्याटप्प्याने सर्व शंभर दशलक्ष लिटर पाणी शहरात येणार आहे, परंतु नळजोडण्या न मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

धोरणात्मक निर्णयाची गरज

वसई-विरार शहरात हजारो अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. बांधकाम व्यावसायकांनी फसवणूक करून नागरिकांनी घरे विकली आहेत. या अनधिकृत इमारतींपैकी काही इमारतींना घरपट्टी लावण्यात आलेली आहे. मात्र नळजोडण्या देण्यात आलेल्या नाहीत. या इमारतीच्या रहिवाशांची नावे मतदारयादीत आहेत. या अनधिकृत इमारतींना नवीन नळजोडण्या न देण्याचे धोरण आहे. अनधिकृत इमारतींना नळजोडण्या देण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी  पालिकेला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार आहे. महासभेची मंजूरी मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

नवीन नळजोडण्यांसाठी ज्यांनी ज्यांनी अर्ज  केले आहेत, त्या सर्वांना त्या दिल्या जाणार आहेत. सध्या आम्ही जलवाहिन्यांच्या क्षमता तपासत असून वर्गीकरण करत आहोत. लवकरच हे काम पूर्ण करून नागिरकांना नवीन नळजोडण्या दिल्या जातील.

सतीश लोखंडे, महापालिका आयुक्त