वसई-विरारच्या बहुतांश भागांना पाणी टंचाईच्या झळा
वसई : उन्हाळा सुरू झाला असून वसई-विरारच्या बहुतांश भागांना पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. यामुळे टँकरने पाणी विकत घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे टँकरच्या किमतीही वाढल्या आहेत.
वसई-विरार शहरातील नागरिकांना पालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. परंतु काही ठिकाणच्या भागांत पालिकेतर्फे पुरविले जाणारे पाणी हे अपुऱ्या प्रमाणात आहे. तर काही भागांत अजूनही पाणी उपलब्ध झाले नाही. यामुळे येथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. वसई-विरार शहरात एक हजाराहून अधिक टँकर आहेत. विशेषत: हे टँकर विरार पूर्व- पश्चिम, नालासोपारा पूर्व, वसई पूर्व, नायगाव यासह विविध ठिकाणच्या भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र दिसून आले.
मागील काही दिवसांपासून वसई-विरारच्या भागात अनियमितपणे पाणीपुरवठा होत असल्याने शहरातील पाणी प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस हा पाणी प्रश्न जटिल होत असल्याने नागरिकांनी आता विकतचे पाण्याचे टँकर मागविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे टँकरच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. ज्या ठिकाणी एका टँकरची गरज होती त्या ठिकाणी दोन मागवावे लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
टँकरच्या वाढत्या मागणी दरातही वाढ झाली आहे. जे पाण्याचे टँकर बाराशे रुपयांना मिळत होते तेच टँकर आता पंधराशे ते सतराशे रुपयाने विकले जाऊ लागले आहे. तर काही ठिकाणी २ हजारांहून अधिक रक्कम पाण्यासाठी मोजावी लागत आहे.
‘ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा करा’
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८९ मधील कामण, चिंचोटी, देवदल, गिदराई (सातिवली) या परिसरांत भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वारंवार टँकरची मागणी करूनही पाणीपुरवठा केला जात नाही. गिदराईपाडा येथील ग्रामस्थांनी नळ कनेक्शनसाठी पैसे भरूनही नळ कनेक्शन दिले जात नाही. कामण दलित वस्ती योजना एक वर्षापासून बंद आहे. कामण येथील लघुपाटबंधारे पाणीपुरवठा योजना बंद आहे. कामण, चिंचोटी, देवदळ येथे दोन महिन्यांपासून रस्ते खोदून जलवाहिनी टाकली आहे. परंतु पाणीपुरवठा केला जात नाही. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नागरिकांना टॅँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने तयारी केली असून दोन ठेकेदार नियुक्त केले आहेत. जशी मागणी होईल तसा त्या त्या भागात टँकरने पाणी उपलब्ध करून दिले जाईल. – शंकर खंदारे, उपायुक्त, वसई-विरार महापालिका
