ठाणे-रायगडातील साडेपाच हजार उद्योगांना फटका; तीव्र पाणीटंचाईमुळे..
जगभरातील उद्योजकांसाठी पायघडय़ा घालत राज्य सरकारकडून ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा दिला जात असतानाच सध्या राज्यभरात भासत असलेली तीव्र पाणीटंचाई मात्र उद्योगांच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. पाणीटंचाईची झळ ठाणे-रायगड जिल्ह्य़ांतील तब्बल साडेपाच हजार कारखान्यांना सोसावी लागत आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) गेल्या पंधरवडय़ापासून लागू केलेल्या पाणीकपातीमुळे काही उद्योजकांवर तर आठवडाभर कारखाने बंद ठेवण्याची वेळ ओढवली आहे.
एमआयडीसीने ठाणे व रायगड जिल्ह्य़ांत गेल्या पंधरवडय़ापासून ६० तासांची पाणीकपात सुरू केली आहे. काही भागांत ही कपात ७५ ते ८० तासांच्या आसपास पोहोचते. त्यातच गेल्याच आठवडय़ात खिडकाळी भागात जलवाहिनी फुटल्याने लक्षावधी लिटर पाणी वाया गेले होते. त्यामुळे पाणीकपात १०० तसांपर्यंत पोहोचली होती. पाणीटंचाईमुळे डोंबिवलीसह आशिया खंडातील सर्वात मोठय़ा म्हणविल्या जाणाऱ्या ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टय़ात सलग चार दिवस पाण्याचा एक थेंबही पोचला नव्हता. त्यामुळे उद्योजकांना कारखाने बंद ठेवावे लागत आहेत. औद्योगिक पट्टय़ातील कारखान्यांना पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर अशा शहरी भागांनाही पाणी पुरवठा केला जातो. ठाणे जिल्ह्य़ातील बारवी आणि पुणे जिल्ह्य़ातील आंद्र धरणातील पाणीसाठा रोडावल्याने पाटबंधारे विभागाने ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना या धरणांतून ठरवून दिलेल्या पाण्याच्या कोटय़ात ३० टक्के इतकी कपात लागू केली आहे.
या कपातीमुळे जिल्ह्य़ातील सर्वच शहरांमध्ये सध्या आठवडय़ातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे. पाटबंधारे विभागाने औद्योगिक विकास महामंडळाला पुरविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठय़ातही कपातीचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार एमआयडीसीचा पाणी पुरवठा सद्य:स्थितीत ७७० दशलक्ष लिटरवरून थेट ५८३ पर्यंत कमी करण्यात आला आहे.
दररोज होणाऱ्या पाणी पुरवठय़ापैकी सुमारे २९० दशलक्ष लिटर इतका पाण्याचा पुरवठा कमी झाल्याने एमआयडीसीने गेल्या पंधरवडय़ापासून औद्योगिक तसेच शहरी विभागासाठी ६० तास पाणी बंदचे वेळापत्रक लागू केले आहे.
ठाण्यातील वागळे इस्टेट, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा, तळोजा भागातील सुमारे साडेपाच हजार कारखान्यांना आठवडय़ातील तीन ते चार दिवस पाण्याविना काढावे लागत आहेत.
– टी. सेशन, विशेष कार्यकारी अधिकारी, ठाणे-बेलापूर लघु उद्योजक संघटना
बारवी धरणाची एकूण पाणीसाठा क्षमता १८१ दशलक्ष घनमीटर असून, सध्या त्यात निम्माच पाणीसाठा शिल्लक आहे.
– एस. आर. तुपे, अधीक्षक अभियंता (एमआयडीसी)