इंग्लंडमध्ये १८९१ मध्ये क्रफ्ट नावाच्या डॉग शोजला प्रारंभ झाला. आजतागायत या क्रफ्ट डॉग शोला जगभरातील श्वानप्रेमींची पसंती लाभली आहे. २०१६ मध्ये इंग्लडमध्ये झालेल्या या क्रफ्ट डॉग शोजमध्ये २३ हजारांमध्ये सवरेत्कृष्ट श्वानांचा किताब मिळवून वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर या श्वानांनी जगाचे लक्ष वेधून घेतले. स्कॉटलंड, इंग्लंडमध्ये १५६७ ते १६२५ च्या दरम्यान हे श्वान विकसित झाले. इंग्लंडमधील किंग जेम्स राजा सहावा याच्या कारकिर्दीत वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर हे श्वान अधिक नावारूपाला आले. याच दरम्यान कर्नल माल्कम यांनी या श्वानांची अधिकृत नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले. फ्रान्सच्या राजाला हे श्वान इंग्लंडमधून भेट म्हणून पाठवण्यात आले. १५८८ मध्ये अर्माडा नावाचे जहाज स्काय या हिमनगावर आदळल्यामुळे अपघात झाला होता. या जहाजातील वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर या श्वानांनी आव्हान स्वीकारत किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचे धैर्य दाखवले.
क्लान डोनाल्ड या तेथील नागरिकाने या श्वानांना वाचवले. इंग्लडमधील आठवा राजा जॉर्ज कॅम्पेल तसेच डॉ. अमेरिकी एडविन फ्लॅक्समॅन यांचे हे श्वान विकसित करण्यात मोलाचे योगदान आहे. वेगवेगळ्या चित्रांच्या, लिखाणाच्या माध्यमातून वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर या श्वानांचे संदर्भ आढळले. इंग्लंडमधील अतिशय जुनी श्वानप्रजात असल्यामुळे तेथील श्वानप्रेमींना वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर श्वानांचा प्रचंड अभिमान आहे. १९०३-०४ च्या दरम्यान इंग्लंडमध्ये हे श्वान अधिकृतरीत्या नोंद झाले. वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर क्लब स्थापन करण्यात आले. या श्वानांमध्ये स्कॉटिश टेरिअर, कॅरन टेरिअर आणि इतर काही श्वान प्रजाती मिश्र करून वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर हे ब्रीड तयार करण्यात आले आहे. टेरिअर जातीत मोडत असल्याने मुळातच शिकार करणे हे या श्वानांचे वैशिष्टय़ आहे. मात्र वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर हे श्वान आकाराने लहान असल्याने सध्या हे श्वान जगभरात शिकारीसाठी न वापरता घरात पाळण्यासाठी वापरले जातात. टॉय ब्रीड प्रकारात या श्वानांची गणना होत असल्याने घरात विरंगुळ्यासाठी हे श्वान उत्तम कामगिरी बजावतात. आत्मविश्वास आणि आव्हान स्वीकारण्याची वृत्ती या वैशिष्टय़ांमुळे वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर या श्वानांनी आपली लोकप्रियता जगभरात जपली आहे.
आकाराने लहान, काळजी कमी
या श्वानांची उंची साधारण दहा ते अकरा इंच आणि लांबी पंधरा ते सोळा इंचापर्यंत असते. वजन जेमतेम चार ते पाच किलोपर्यंत असते. यामुळे घरात पाळण्यासाठी हे श्वान उत्तम असतात. पूर्ण पांढरा रंग आणि शरीरावर लहान आकारातील केस अशी यांची शरीरयष्टी असल्याने दिसायला हे श्वान गोंडस वाटतात. शरीरावर बारीक केस असल्यामुळे केवळ केसांची काळजी श्वान मालकांना घ्यावी लागते. मूळचे थंड प्रदेशातील असल्यामुळे भारतातील वातावरण या श्वानांना फारसे सहन होत नाही. भारतात पाळायचे असल्यास थंड वातावरणात या श्वानांना ठेवावे लागते. सकाळचे कोवळे ऊन यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. टॉय ब्रीडसाठी दिला जाणारा संतुलित आहार आणि टेरिअर ब्रीड असल्यामुळे करावा लागणारा व्यायाम या श्वानांना दिल्यास घरात पाळताना जास्त काळजी घ्यावी लागत नाही.
पूर्वी शिकारीसाठी वापर
पूर्वी इंग्लंडमध्ये श्रमजीवी लोकांकडून शिकारीसाठी या श्वानांचा उपयोग केला जायचा. बिळात असणारे ससे, कोल्हे शोधून काढण्याचे काम वेस्ट हायलँड व्हाइट टेरिअर हे श्वान करत. बिळात शिकार असल्याचा संशय असल्यास खोल बिळात जाऊन शिकार असल्याची खात्री हे श्वान करून घेत. बिळात शिकार असल्यास बिळाबाहेर येऊन भुंकत किंवा बीळ पोखरून मोठे करण्याचा प्रयत्न करत.
