अंबरनाथः अंबरनाथच्या औद्योगिक क्षेत्रात स्थानिक कंत्राटदारांकडून वाहतूक, मजूर पुरवठा, बांधकाम आणि इतर सुविधा या बाजारभावापेक्षा दुप्पट ते तिप्पट दराने दिले जाते. या वाढीव खर्चामुळे उद्योजकांचे उत्पादन खर्च वाढतात, स्पर्धात्मकता कमी होते आणि उद्योगांना आर्थिक नुकसान सहन करावा लागतो. असा आरोप करत येथील कंपन्या राज्याबाहेर जात असल्याचा आरोप उद्योजकांची संघटना असलेल्या आमाचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केला होता. यानंतर बुधवारी स्थानिक भूमीपुत्रांनी थेट आमाच्या कार्यालयावर धडक देत जाब विचारला. त्यानंतर पोलीस, स्थानिक आमदार यांच्या मध्यस्थीनंतर आमाच्या वतीने या वक्तव्यावर माफी मागत यापुढे एकत्र येत काम करण्याचे आश्वासन देण्यात आले.

अंबरनाथ शहरात तीन औद्योगिक वसाहती आहेत. यातील आनंदनगर अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील एडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या वतीने गेल्या आठवड्यात माध्यमांशी संवाद साधत येथील समस्या सांगण्यात आल्या. यावेळी आमाचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी स्थानिक कंत्राटदार, मजूर पुरवठा करणाऱ्या कंपन्या, वाहतूक कंत्राटदार यांच्या बाजारभावापेक्षा दुप्पट ते तिप्पट दराने पैसे आकारत असल्याचा आरोप केला होता. या परिस्थितीमुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी उत्पादनाचा मोठा भाग राज्याबाहेर हलवला आहे, असे सांगत हे सुरू राहिल्यास येत्या काळातही उद्योज गुजरातमध्ये जातील अशी भीती व्यक्त केली होती. याविरूद्ध संताप व्यक्त करत स्थानिक ग्रामस्थ, कंत्राटदार आणि भूमीपुत्रांंनी बुधवारी आमा संघटनेच्या कार्यालयावर धडक दिली.

यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. तर प्रकरण चिघळू नये म्हणून अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकरही उपस्थित होते. यावेळी आमा संघटनेच्या अध्यक्षांनी दिलेल्या वक्तव्यावर मोर्चेकऱ्यांनी संताप व्यक्त केला. स्थानिकांनी स्वतःचा जमिनी उद्योगासाठी दिल्या त्यावेळी त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र या आश्वासनाचा एमआयडीसी आणि कंपन्यांना विसर पडला आहे, असा दावा येथील ह.भ.प. विश्वनाथ वारिंगे यांनी केला. आज परप्रांतीय कामगारांना हाताशी धरून उद्योग चालवले जात आहेत. आमचे कायम सहकार्य आहे. फक्त चुकीची माहिती देत बदनामीचा प्रयत्न निषेधार्ह आहे असेही वारिंगे म्हणाले. येथील फणशीपाडा, बोहनोली, पाले, जांभिवली येथील ग्रामस्थांनी आपल्या जागा दिल्या. त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. उद्योजकांचे दबावतंत्र चालणार नाही, असा इशाराही यावेळी उपस्थितांनी दिला.

त्यावर बोलताना स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही कंपन्यांकडून चुकीची माहिती दिली गेली. त्यातून हे वक्तव्य आले. कोणताही भूमीपुत्र दादागिरी करत नाही. पोलिसांकडूनही आम्ही माहिती घेतली आहे. त्यामुळे त्यांनी या वक्तव्याबद्दल मागी मागितली, असे किणीकर म्हणाले.

वक्तव्य संभ्रमातून

माझे वक्तव्य हे संभ्रमातून आले होते. त्याबद्दल मी माफी मागतो. आमची बैठक झाली. आम्ही भूमीपुत्रांना अधिकार देणार. यापुढे एकत्र येऊन काम करणार, अशी प्रतिक्रिया आमा संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी यावेळी दिली.