कंपनी मालकाने एप्रिल महिन्याचे वेतन दिले नाही, याचा राग आल्यामुळे संतप्त झालेल्या दोन कामगाराने साथीदारांच्या मदतीने रात्रीच्या वेळेत कंपनीत घुसून कंपनीतील दीड लाख रूपयांचे उत्पादनासाठी लागणारे सामान चोरून नेले. मानपाडा पोलीस ठाण्यात कंपनी मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मृत्यूंजय शर्मा, हैदर व त्याचा अन्य एक साथीदार अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, विशाल पुरी यांचे आयर्न फर्स्ट फॅब्रिकेशनचे वर्कशाॅप डोंबिवली पूर्वेतील म्हात्रेनगरमधील ललित काट्याजवळ आहे. या कंपनीत काही कामगार काम करतात. मृत्यूंजय शर्मा हाही येथे कामगार म्हणून काम करतो. कंपनी मालक विशाल पुरी यांनी शर्मा याला एप्रिल महिन्याचा पगार दिला नाही. त्याचा शर्माला राग आला होता. तगादा लावूनही पगार मिळत नसल्याने शर्मा नाराज होता.
वेतन न मिळाल्याने त्याने मालकाच्या कंपनीत चोरी करून ते वसूल करण्याचा निर्णय घेतला. मृत्यूंजय त्याचे हैदर व अन्य साथीदार असे तिघे रात्रीच्या वेळेत कंपनीच्या आवारात घुसले. वर्कशॉपच्या बाहेर उत्पादनासाठी ठेवलेले एक लाख ५० हजार रूपये किमतीचे फॅब्रिकेशनचे साहित्य चोरून नेले. वर्कशॉप परिसरातील सीसीटीव्हीमध्ये ही चोरी कैद झाली. सकाळी कंपनी सुरू करण्यासाठी विशाल पुरी आले. तेव्हा त्यांना बाहेर ठेवलेले साहित्य दिसले नाही. या प्रकरणी त्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुरी यांनी व्यक्त केलेल्या संशयावरून पोलिसांनी मृत्यूंजय व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू केला आहे.