पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) नक्की काय आहे? त्याची व्यवस्था कशी चालते? असे अनेक प्रश्न आपली उत्सुकता वाढवत असतात. त्याचअनुषंगाने कधीही बंद नसणाऱ्या पीएमओचा खर्च किती आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. याबाबत एक गोष्ट ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, पीएमओचा एकूण बजेटचा ७० ते ८० टक्के भाग हा केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होत असल्याचे समोर आले आहे. पीएमओसाठी मोठ्या प्रमाणावर बजेट मंजूर होत असतानाही केवळ वेतनावरच इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे.

पीएमओच्या खर्चामध्ये पंतप्रधानांचे परदेश दौरे, पंतप्रधानांच्या विशेष विमानाच्या देखभालीचा खर्च आणि इतर गोष्टींचा देखील समावेश आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांचे देश-विदेशातील खर्च देखील पीएमओ अंतर्गतच येतात. देशातील सर्वोच्च अधिकारी हे देखील पीएमओमध्येच कार्यरत आहेत. हिंदुस्तान टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या वृत्तानुसार, पीएमओच्या बजेटचा १०-१५ टक्के हिस्साच केवळ कार्यालयाच्या खर्चाच्या रुपात असतो. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये पीएमओचा एकूण खर्च ४६.९ कोटी रुपये होता. यांपैकी ३५.९६ कोटी रुपये कर्चमाऱ्यांचं वेतन देण्यातच खर्च झाले आहेत. तर ५.५६ कोटी रुपये कार्यालयाच्या इतर खर्चामध्ये समाविष्ट होते.

वित्त आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर २०१६-१७ च्या तुलनेत हा खर्च वाढला आहे. पंतप्रधान कार्यालयामध्ये कधीही सुट्टी नसते. पीएमओतील अनेक वरिष्ठ अधिकारी शनिवारी आणि रविवारी देखील कामानिमित्त कार्यालयात येत असतात. इथल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः कामात व्यस्त असणारे व्यक्ती आहेत. याच कारणामुळे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एका दिवसाचीही सुट्टी घेतलेली नाही.”