ब्रेक फेल झाल्यानंतर ट्र्क ड्रायव्हरने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे उत्तर प्रदेशात मोठा अपघात टळला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील टोल नाक्याच्या दिशेने जाणारा एक ट्रक जवळजवळ दुर्घटनाग्रस्त होण्याच्या स्थितीत असतानाच चालकाने अवघ्या काही सेकंदात वाहनावर परत नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला आहे. हा ट्रक दादरी-लुहारली मार्गावरून जात असताना त्याचा ब्रेक फेल झाला. हा ट्र्क टोल नाकाच्या अगदी कोपऱ्यातल्या लेनमध्ये रस्त्याच्या मधोमध फिरताना पाहायला मिळाला. पुढे २ वाहनं असून देखील ब्रेक फेल झालेला हा ट्रक पुढे पुढेच जाताना दिसून आला आहे.
पुढे या व्हिडिओमध्ये दिसून आलं आहे, पुढील गाड्यांना ठोकून होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ट्रक चालकाने त्या लेनच्या जास्तीत जास्त कडेने जाण्याचा प्रयत्न केला. ज्यात डिव्हायडर आणि सेंसर्सचं मोठं नुकसान झालं. परंतु, पुढील गाड्या बचावल्या. तसंच यामुळे ट्र्कचा वेग देखील कमी झाला आणि तो थांबवता येणं शक्य झालं. अशा पद्धतीने, ट्र्क चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. अंगावर शहारा आणणारी ही संपूर्ण घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
सीसीटीव्हीत कैद झालेली ‘ही’ घटना पाहूया
उत्तर प्रदेशातील दादरी लुहारली टोल नाक्यावरच ट्रकचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधानाने टळली दुर्घटना; थरार सीसीटीव्हीत कैद#UttarPradesh #Tollplaza pic.twitter.com/WHiQwxdfJq
— LoksattaLive (@LoksattaLive) August 29, 2021
टोल नाक्यांवर होणाऱ्या या दुर्घटना सामान्य नाहीत. वाहनावरील नियंत्रण सुटल्यास मोठ्या दुर्घटना होऊ शकतात. डिसेंबर २०२० मध्ये मध्य प्रदेशातील एक टोल नाक्यावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला होता. पीडित ज्या कारमधून प्रवास करत होते ती कार सिओनीजवळील टोल नाक्यावर उभ्या असलेल्या एका तेलाच्या टँकरला धडकली होती.