Fake Leopard AI Video: AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान जितकं उपयुक्त आहे, तितका त्याचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे. भारतासारख्या देशात जिथं अफवांमुळे अनेक संकटं आल्याची उदाहरणं आहेत, तिथं एआयचा चुकीचा वापर घातक ठरू शकतो. लखनौमध्ये याची प्रचिती नुकतीच आली. लखनौमधील काही परिसरात बिबट्या दिसल्याची अफवा पसरल्यानंतर घबराट पसरली. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केलं गेलं. वनविभागाकडून बिबट्याचा शोध सुरू झाला, पण नंतर समोर जे आलं, त्यामुळं सर्वांनाच धक्का बसला.
लखनौमध्ये बिबट्या शिरल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने तपास मोहीम हाती घेतली. बारकाईने तपास केल्यानंतर त्यांना समजलं की, व्हायरल होणारे व्हिडीओ पूर्णपणे खोटे होते. एका तरूणाने गमतीत एआयच्या मदतीनं सदर व्हिडीओ तयार करून व्हायरल केले होते. नंतर सदर तरुणाला अटक करण्यात आली. शहरात बिबट्या आलाच नव्हता, हे सांगावं लागलं.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळं लखनौमध्ये खळबळ उडाली होती. अनेक रहिवाशांनी त्यांच्या घरा समोरील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले. जेणेकरून त्यांच्या परिसरातून बिबट्या गेला आहे का? याची पडताळणी होईल. काही पालकांनी भीतीपोटी मुलांना घरातच थांबवलं. नागरिकांमध्ये घबराट पसरल्यामुळं पोलीस आणि वनविभागानं कसून चौकशी केली. अनेक घरे आणि दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले.
अखेर एआयच्या मदतीने व्हिडीओ तयार करणाऱ्या मुलाचा शोध घेऊन त्याला अटक झाली. याबद्दलच्या पोस्ट एक्सवर शेअर करण्यात आल्या आहेत. या पोस्टना लाखो व्ह्यूज मिळत आहेत. तसेच अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया या पोस्टखाली व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले, तुम्ही खरं सांगितलं तर पोलीस यंत्रणा तुमच्यावर विश्वास न ठेवता, जराही हालचाल करत नाही. पण जेव्हा एखादं खोटं पसरवलं जातं, तेव्हा मात्र यंत्रणा कामाला लागते आणि मग तुम्हाला तुरुंगात धाडलं जाऊ शकतं. पण या मुलाची कृती खरंच गंभीर होती. त्याने व्हिडीओ शेअर करण्यापूर्वी व्हिडीओ एडीट केलेले असल्याची सूचना द्यायला हवी होती.
दुसऱ्या एका युजरनं म्हटलं की, सरकारने आता एआयच्या सहाय्याने तयार केलेल्या ऑडिओ, व्हिडीओ आणि फोटोंसाठी एक धोरण तयार करायला हवं. अशा सामुग्रीवर एआय जनरेटेड लिहिलेलं असावं. यामुळं गैरसमज पसरणार नाहीत आणि गोंधळही होणार नाही.
तिसऱ्या एका युजरनं लिहिलं, एआय तुम्हाल फोटो, व्हिडीओ तयार करून देऊ शकतो, पण तुमच्या जामीनाचे पैसे भरू शकत नाही. त्यामुळे पोलिसांत गुन्हे दाखल होतील, असं काही काम करण्यापेक्षा पैसे कमावता येतील, असं काम करावं.
