एअर इंडियामध्ये गेली ३८ वर्षे एअर होस्टेसची नोकरी करणाऱ्या पूजा चिंचणकर यांचा निवृत्ती समारंभ खऱ्या अर्थानं खास ठरला. ज्या विमानसेवा कंपनीत त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ काम केलं त्याच कंपनीत त्यांची मुलगी आज वैमानिक होती, ही बाब त्यांच्यासाठी खऱ्या अर्थांनं अभिमानाची होती. विशेष म्हणजे सेवाकाळाच्या शेवटच्या दिवशी त्या ज्या विमानात एअर होस्टेस म्हणून काम पाहत होत्या त्याच विमानात सहवैमानिक म्हणून त्यांची मुलगी काम पाहत होती.

एका आईसाठी असा खास क्षण दुसरा असूच शकत नव्हता. कदाचित अशाप्रकारच्या दुर्मिळ निरोप समारंभाचा योग क्वचितच एखाद्या विमानसेवा कंपनीत पाहायला मिळाला असेल. एअर इंडियाच्या बंगळुरू – मुंबई विमानात हा अनोखा सोहळा पार पडला. १९८० साली पूजा चिंचणकर एअर होस्टेस म्हणून रुजू झाल्या. त्याकाळी महिला वैमानिक तशा कमीच होत्या. म्हणूनच मी माझ्या मुलीला वैमानिक करण्याचं स्वप्न उराशी बागळलं, असं त्या म्हणाल्या.

आज त्यांची मुलगी आश्रिता सहवैमानिक म्हणून काम करत आहे. ‘३८ वर्षे मी इथे काम केलं. शेवटच्या दिवशी मुलीनं आणि मी एकाच विमानातून प्रवास करण्याची इच्छा मी कंपनीकडे व्यक्त केली ती पूर्णही झाली ‘ अशा शब्दात पूजा यांनी आनंद व्यक्त केला आहे.