सध्या सोशल मीडियावर एलियन्स, उडत्या तबकड्या दिसल्याचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या सूर्यग्रहणादरम्यानही एका व्यक्तीने उडती तबकडी वेगाने हवेत उडत, काही सेकंदांत गायब झाल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतानाच आता अजून एका व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये, आकाशात तरंगणारी एक विचित्र व चमकदार गोष्ट नागरिकांना दिसली असल्याचे आपण पाहू शकतो. हा प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरामधील सेक्विया पार्कमध्ये घडल्याचे व्हिडीओखाली लिहिलेल्या कॅप्शनमधून समजते. व्हायरल व्हिडीओ हा ‘ब्ल्यू बीम’ प्रोजेक्टचा भाग असल्याचेदेखील अनेकांना वाटत आहे, असे व्हिडीओखालील प्रतिक्रियांमधून समजते. ज्यांना प्रोजेक्ट ब्ल्यू बीमबद्दल माहीत नाही त्यांच्यासाठी प्रोजेक्ट ब्ल्यू बीम हा परदेशातील एक वादग्रस्त प्रकल्प आहे; जो अज्ञात हेतु हाताळण्यासाठी वापरला जातो.

हेही वाचा : सूर्यग्रहण लागताना आकाशात दिसले ‘UFO’? व्हिडीओत कैद झालेले दृश्य पाहा; तुम्हीही व्हाल चकित

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नेमके काय दिसले आहे ते पाहू. निरभ्र निळ्या रंगाच्या आकाशामध्ये अत्यंत प्रखर पांढऱ्या रंगाची चमकणारी एक आकृती आपल्याला हलताना पाहायला मिळते. या आकृतीच्या अवतीभोवती हिरव्या, गुलाबी, रंगाचे चमकदार वलयदेखील दिसत आहे. या आकृतीचे नीट निरीक्षण केल्यास ती एखाद्या मानवाच्या आकाराची असल्याचे आपल्याला लक्षात येते. तसेच त्या मानवासारख्या आकृतीने आकाशात गोल फिरत असताना आपले दोन्ही हात, दोन्ही बाजूंना पसरवल्यासारखे दिसतात. अशा अगदी काही सेकंदांचा हा व्हिडीओ आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या विचित्र चमकदार आकृतीला पाहून नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रया आहेत ते पाहू.

“अरे यार, हे सॅटेलाईट आहे. मीही तिथेच होते आणि मीसुद्धा पाहिलं आहे हे…” असे एकीने लिहिले आहे.
“कुणीतरी ब्ल्यू बीम प्रोजेक्टची चाचणी घेत आहे, असं वाटतं..” असे दुसऱ्याने लिहिले आहे.
“हा अनेक वर्षांपूर्वीचा, जुना झालेला व प्रचंड आकाराचा सॅटेलाईटचा फुगा असू शकतो; जो आता हवेमध्ये तरंगत आहे. बास बाकी अजून काही नाही”, असे स्पष्टीकरण तिसऱ्याने दिले.
“कुणीतरी आकाशात हॅलोग्राम लावलाय”, अशी प्रतिक्रिया चौथ्याने दिली आहे.

हेही वाचा : माकडांपासून ते माश्यांपर्यंत ‘या’ प्राण्यांनी केला आहे अंतराळ प्रवास! जाणून घ्या ‘ही’ रंजक माहिती….

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @garbaggio.conspiracy नावाच्या अकाउंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ५०.६K इतके व्ह्युज मिळाले आहेत.