झाडी, डोंगार, सुमद्र अन् राजीनामा: पाच लाख ३७ हजार कोटींच्या कंपनीचं CEO पद सोडलं; राजीमान्याचं कारण दिलं, “आई-वडिलांसोबत…”

२७ वर्षांचा अनुभव असणाऱ्या या व्यक्तीने अचानक आपल्या पदाचा राजीनामा देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला

beach australia
त्यांनी ऑस्ट्रेलिया जाणार असल्याचं सांगितलंय (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स)

एका लोकप्रिय जाहिरातीनुसार ‘क्या चल रहा है?’ असा प्रश्न महाराष्ट्रात विचारला तर ‘झाडी, डोंगार, हाटील’ असं उत्तर द्यावं लागेल. सध्या सोशल मीडियावर हा ट्रेण्ड तुफान धुमाकूळ घालत असतानाच तिकडे लंडनमध्ये एका व्यक्तीने चक्क याच झाडी, डोंगर अन् समुद्रकिनाऱ्यासाठी मोठ्या पदावरील नोकरीचा राजीनामा दिलाय असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे वृत्त खरं आहे. लंडनमध्ये मुख्यालय असणाऱ्या ज्युपिटर फंड मॅनेजमेंट या खासगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅण्ड्रू फॉर्मिका यांनी अचानक राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय. फॉर्मिका यांनी

६८ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकं म्हणजेच पाच लाख ३७ हजार कोटी रुपये मूल्य असणाऱ्या या कंपनीमध्ये फॉर्मिका हे २०१९ साली रुजू झाले होते. ते एक ऑक्टोबर रोजी आपलं पद सोडणार आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेनं कंपनीने दिलेल्या माहितीच्या आधारे हे वृत्त दिलं आहे.

सध्या कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी असणारे मॅथ्यू बेस्ली हे या फॉर्मिका यांची जागा घेतील. याशिवाय फॉर्मिका हे या कंपनीच्या निर्देशक पदावरुनही राजीनामा देणार आहे. फॉर्मिका यांनी खासगी कारणामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं कंपनीने म्हटलंय. त्यांना आपल्या मूळ देशात म्हणजेच ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या वयस्कर आई-वडिलांसोबत वेळ घालवायचा आहे, असं कारण त्यांनी कंपनीला दिल्याचं समजते.

“मला फक्त समुद्रकिनारी बसून रहायचं आहे, एकदम निवांत काहीच काम न करता,” असं आपल्या भविष्यातील नियोजनासंदर्भात बोलताना फॉर्मिका यांनी ब्लूमबर्गला सांगितलं. म्हणजेच आपल्याला समुद्रकिनाऱ्यावर बसून केवळ झाडी, डोंगर आणि समुद्र पाहत निवांत वेळ घालयावचाय असं फॉर्मिका यांनी सूचित केलंय.

फॉर्मिका हे मागील तीन दशकांपासून इंग्लडमध्ये आहेत. २०१९ पासून ते ज्युपिटरमध्ये असले तरी त्यापूर्वी त्यांनी जऍनस हेंडरसन ग्रुपमध्ये काम केलं आहे. त्यांनी अमेरिकेतील जॅनस आणि युकेमधील हेंडरसन समुहाच्या विलनीकरणामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. फॉर्मिका यांना गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील २७ वर्षांचा अनुभव असून त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका पार पाडल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Andrew formica ceo quits 68 billion usd firm to sit at the beach and do nothing scsg

Next Story
VIDEO: चिपळूणमध्ये मगरीने अडवला रस्ता; गाड्यांचे हॉर्न ऐकूनही सोडला नाही रस्ता, व्हिडीओ व्हायरल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी