नुकताच जपानचा दौरा करुन आलेल्या एका महिलेने तिचा अनुभव सांगितला. ज्यानंतर सोशल मीडियावर तिच्या पोस्टची चर्चा सुरु झाली आहे. मला जपानला नोकरी निमित्ताने जाण्याची संधी चालून आली होती. पण मी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. मात्र काही दिवसांपूर्वी मी जपानला जाऊन आले तेव्हा मला वाटलं की माझा निर्णय चुकला आहे, असं या महिलेने म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे महिलेने?

बंगळुरुच्या महिलेने बंगळुरु आणि टोकियोची तुलना करत एक पोस्ट लिहिली आहे. जी व्हायरल झाली आहे. मी नुकतीच जपानला जाऊन आले. भारतात परतल्यावर मला हे जाणवलं की मी जपानला जाण्याची संधी नाकारुन खूप मोठी चूक केली आहे. मी चुकीचा निर्णय घेतला असंच आता मला वाटतं आहे. मी दोन दिवस साधारण २५ किमी चालले. जपान पाहिलं, टोकियो पाहिलं आणि मला जाणवलं की भारत पुढच्या १०० वर्षांमध्ये इतका चांगला देश होऊ शकत नाही. जपानमध्ये असलेले पदपथ खूप सुंदर आहेत. उघडी गटारं नाहीत, रस्त्याच्या बाजूला कचरा साठलेला नाही, कुत्र्यांनी घाण केलेली नाही. दिव्यांगांसाठी आणि अंध व्यक्तींसाठी व्हिल चेअर आहेत. आपल्या देशात अशा प्रकारचा एक किमीचा फूटपाथ दाखवून द्या मी म्हणाल ती पैज हरायला तयार आहे.

जपानला जाण्याची संधी उगाच नाकारली, अशी या महिलेची पोस्ट आहे

मी बंगळुरुमध्ये राहते, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या १ टक्के लोकांमध्ये मी आहे याबाबत मी स्वतःला भाग्यवान समजते. मात्र मी रस्त्यावरुन चालताना जेव्हा एखाद, दुसरी बाईक माझ्या बाजूने जात असते किंवा बाईकस्वार दिसले की मी घाबरते. कारण नियम पाळण्याचा आणि या बाईक स्वारांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही. कुणीही मनाला येईल तशी टू व्हिलर चालवतं. बंगळुरु आणि जपानच्या टोकियोच्या तुलनेत टोकियो जास्त चांगलं आहे. एवढंच नाही तर जपानमध्ये लोकांसाठी जी वाहतूक सेवा आहे ती देखील खूप स्वच्छ आणि नीटनेटकी आहे. जपानमध्ये मी गेले तेव्हा पाऊस होता पण माझे बूट मुळीच खराब झाले नाहीत. रस्ते इतके स्वच्छ होते की मला माझं प्रतिबिंब दिसत होतं. आता मला खरंच पश्चात्ताप होतो आहे की जपानला जाण्याची संधी का नाकारली? मी भारतात थांबण्याचा निर्णय घेतला आहे पण मला आत्ता त्याचा पश्चात्ताप होतो आहे. अशी रेड इट पोस्ट या महिलेने लिहिली आहे. हिंंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया काय?

या महिलेच्या पोस्टनंतर आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. जे लोक देशाबाहेर जातात त्यांचे डोळे उघडतातच. आपल्याकडे अजून साध्या साध्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो आहे हे वास्तव आहे. तुमची पोस्ट वाचून हेच जाणवलं असं एका युजरने म्हटलं आहे. आणखी एक युजर म्हणतो मी सिंगापूरहून परतलो. तिथेही सगळ्या सेवा उत्तम आहेत. अगदी रुग्णवाहिकेची सेवाही उत्तम आहे. सार्वजनिक बस सेवा, टॅक्सी सेवा उत्तम आहेत. आपल्याकडे हे व्हायला कितीही काळ लागू शकतो. बंगळुरुत तर बससेवा कशी आहे याबद्दल काही बोलणंच नको. आणखी एका युजरने म्हटलं आहे मी २०२२ मध्ये जर्मनीला जाऊन आलो. तिथे आल्यानंतर माझा दृष्टीकोनच बदलला.