भांगड्याचे वेड पंजाबमध्ये तर आहेच परंतु भांगडा नृत्य केल्याशिवाय पूर्ण भारतात कदाचित एकही वरात निघत नसेल. केवळ भारतातच नाही तर भांगड्याचे वेड संपूर्ण जगाला लागू शकते याची एक झलक भारतीय वंशाच्या काही तरुणांनी दाखवली.

तसं पाहायला गेलं तर जगभरात टीव्हीवर टॅलेंट शो होतात. बहुतेक वेळा या टॅलेंट शोमध्ये जजेस केवळ चांगले गुण देऊन तारिफ करतात. पंरतु या तरुणाच्या नृत्याने त्यांना अक्षरशः वेड लावले आणि जजेसदेखील पंजाबी गाण्यावर नृत्य करू लागले.

झलक पंजाब दी असे या भांगडा समूहाचे नाव आहे. आपल्या रंगबेरंगी फेट्यांनी आणि आपल्या बहारदार नृत्याने त्यांनी अक्षरशः लोकांचे चित्त वेधून घेतले. त्यांनी नृत्य सुरू करताच काही सेकंदातच शोमधील सर्व प्रेक्षक उठून नाचायला लागले. थोड्याच वेळात त्यांनी प्रेक्षकांची आणि तेथील समीक्षकांची मने जिंकली.

त्या जजेसला आणि प्रेक्षकांना त्यांचे नृत्य इतके आवडले की त्याच्यावर नाचायचा मोह त्यांना आवरता आला नाही. पुन्हा एकदा पंजाबी गाण्यावर ठेका धरुन त्यांनी नृत्य केले.

पंजाबी गाण्याची आवड केवळ भारतीयांनाच आहे असे नाही ज्याठिकाणी पंजाबी पोहचले तेथे त्यांनी भांगडा पोहचवला आहे. याआधी कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी देखील भांगडा करून सर्वांना चकित करुन सोडले होते.

याआधी अमेरिकेमध्ये अमेरिका गॉट टॅलेंट या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जेव्हा अमेरिकन-भारतीयांनी भांगडा सादर केला होता तेव्हादेखील त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता.

अमेरिका, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये भांगडा तर आता नित्याचेच समजले जाते तसेच त्यांच्याही बहुविध संस्कृतीचा एक भागच समजल्या जात आहे. परंतु ज्या प्रकारे बेल्जियमध्ये देखील या नृत्याला डोक्यावर घेण्यात आले ते पाहून असे वाटते की जगभरात भांगडा लवकरच पसरू शकेल.