CRPF Dog Dies : तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर असलेल्या करेगुट्टा टेकडीवर नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान सुरक्षा दलाच्या एका श्वानाचा (CRPF Female Dog) मृत्यू झाला. या सीआरपीएफच्या श्वानावर मधमाशांनी हल्ला केला. जवळपास २०० मधमाशांच्या डंकानंतर अॅनाफिलेक्टिक शॉकमुळे या श्वानाचा मृत्यू झाला. करेगुट्टा टेकडीवरून एका विशेष कारवाईदरम्यान परतत असताना रोलो नावाच्या या श्वानावर मधमाशांनी हल्ला केल्याचे समोर आले.
नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान CRPF च्या श्वानावर २०० मधमाशांचा हल्ला
सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितल्याप्रमाणे, ११ मे रोजी संपलेल्या २१ दिवसांच्या मेगा ऑपरेशनमध्ये स्फोटके शोधण्याचे काम या रोलोवर सोपवण्यात आले होते. २७ एप्रिल रोजी झालेल्या कारवाईनंतर मधमाशांनी रोलोवर हल्ला केला आणि तिचा मृत्य झाला. छत्तीसगडमधील सुकमा येथे २७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२.२५ वाजता दोन वर्षीय रोलोला मृत घोषित करण्यात आले. सीआरपीएफच्या महासंचालकांनी श्वानाला मरणोत्तर प्रशंसा पदक प्रदान केले आहे.
करेगुट्टा टेकडी ही छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर आहे आणि येथे अस्वल, कीटक आणि मधमाशांसारखे वन्य प्राणीजीव राहतात, तसेच तलाव – नद्या आणि नैसर्गिक गुहादेखील आहेत. या घनदाट जंगलामुळे अनेक नक्षलवादी या ठिकाणी लपतात.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, मधमाशांच्या हल्ल्यानंतर रोलोच्या प्रशिक्षकाने तिला पॉलिथिन शीटने झाकले, पण मधमाशा खूप आत शिरल्या होत्या. तीव्र वेदना आणि चिडचिड झाल्यामुळे तिचे स्वत:वरील नियंत्रण सुटले होते, त्यामुळे ती पॉलिथिटन शीटच्या कव्हरमधून बाहेर पडली, ज्यामुळे मधमाशांनी तिच्यावर आणखी हल्ला चढवला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रोलोला जवळपास २०० वेळा मधमाशांनी डंक मारले आणि त्यानंतर वेदनेने रोलो बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला घटनास्थळावरून बाहेर काढण्यात आले आणि प्रशिक्षकाने तिच्यावर उपचार केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २७ एप्रिल रोजी वैद्यकीय उपचारासाठी नेताना तिचा तीव्र वेदनेने मृत्यू झाला आणि सुरक्षा दलाच्या पशुवैद्यकांनी तिला मृत घोषित केले.
कर्नाटकातील बंगळुरूजवळ तारालू हे ठिकाण आहे. तारालू हे सीआरपीएफ डॉगच्या प्रशिक्षण केंद्रासाठी ओळखले जाते. येथे रोलोने प्रशिक्षण घेतल्यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये छत्तीसगडमध्ये नक्षलाद्यांविरोधात कारवाईंसाठी तिला तैनात करण्यात आले होते.