महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल नेटवर्किंगवर अॅक्टीव्ह आहेत. अगदी व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या फोटोंपासून सुविचारांपर्यंत अन् वेगवेगळ्या कल्पना ते ट्विटवरुन मांडत असतात. अनेकदा त्यांनी केलेले ट्विट व्हायरल झाल्याचे पहायला मिळते. अनेकदा सोशल मीडियावरुन समोर आलेल्यांना त्यांनी मदतीचा हातही दिला आहे. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. आनंद महिंद्रा यांनी मध्य प्रदेशमधील एका व्यक्तीची मदत केली आहे. त्या व्यक्तीनं लॉकडाउनमध्ये बापाचं कर्तव्य बजावत मुलाच्या परीक्षेसाठी तब्बल १०५ किमी सायकल चालवली. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील ही व्यक्ती आहे.
धारमधील या व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी त्या व्यक्तीच्या कर्तव्याला सलामही केला आहे. सोशल मीडियावर त्या व्यक्तीचं कौतुक सुरु असताना आंनंद मंहिद्रा यांनी कौतुक तर केलेच शिवाय त्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारीह स्वीकारली. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत याची माहिती दिली. या निर्णयामुळे नेटकऱ्यांनी आनंद महिंद्रा यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहलेय की, ‘मुलाच्या भविष्यासाठी स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी झटणाऱ्या बापाला सलाम. अशीच स्वप्नं देशाला पुढे घेऊन जातात. आमची संस्था आशिषच्या पुढील सर्व शिक्षणाचा खर्च उचलत आहे.’ आनंद महिंद्रा यांनी या कुटुंबाशी संपर्क करण्यासाठी पत्रकारांची मदत मागितली आहे.
A heroic parent. One who dreams big for his children. These are the aspirations that fuel a nation’s progress. At @MahindraRise we call it a Rise story. Our Foundation would be privileged to support Aseesh’s further Education. Could the journalist please connect us? pic.twitter.com/KsVVy6ptMU
— anand mahindra (@anandmahindra) August 20, 2020
धार जिल्ह्यातील बायडीपुरा येथील राहणारे शोभाराम यांचा मुलगा आशिष दहावीमध्ये शिक्षण घेतोय. दहावीच्या परीक्षासाठी जिल्ह्यातील फक्त धार केंद्राची निवड केली होती. करोना विषाणूमुळे सर्व बस आणि वाहतूक बंद होती. परिणामी मुलाच्या परीक्षेसाठी बापानं १०० किमीपेक्षा जास्त सायकल चालवून मुलाला परीक्षेच्या केंद्रावर पोहचवलं. या प्रवासाठी त्यांनी दोन दिवसाचं जेवण घेतलं होतं. रात्री मंदिर आणि शाळेत आराम करत ते धार येथे परिक्षेसाठी पोहचले होते.
