Viral video fact check: गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले आहे. सुदर्शन सेतू हा भारतामधील बांधलेला सर्वात लांब केबल ब्रिज आहे. ‘सिग्नेचर ब्रिज’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा पूल कच्छच्या खाडीतून, द्वारका जिल्ह्यातील ओखा शहराला थेट द्वारका बेटाशी जोडणार आहे. या सेतूच्या उद्घाटन सोहळ्यामधील पंतप्रधान मोदींचा एक व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला तरी हात दाखवताना दिसत आहेत. केवळ एवढेच या व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये दिसत आहे. मात्र, शेअर होणाऱ्या या व्हिडीओत, पीएम मोदी चक्क समुद्रातील माश्यांना पाहून त्यांना हात दाखवत असल्याचा दावा सोशल मीडिया वापरकर्ते करत आहेत. परंतु, आम्ही जेव्हा या व्हायरल व्हिडीओवर तपास केला, तेव्हा आम्हाला इंटरनेटवर फिरणाऱ्या या क्लिपमागे नेमके सत्य काय आहे ते समजले. तपासानुसार, व्हायरल होत असलेला हा दावा खोटा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोटीमध्ये बसलेल्या लोकांकडे बघून हात दाखवत आहेत असे समजते.

हेही वाचा : शेतकरी आंदोलनाला विरोध करण्यासाठी लोक खरंच उतरले रस्त्यावर? जाणून घ्या ‘या’ Viral video मागील सत्य

काय होत आहे व्हायरल?

Riju Dutta नावाच्या एका एक्स [पूर्वीचे ट्विटर] वापरकर्त्याने व्हायरल होणारा व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला आहे.

इतर वापरकर्तेसुद्धा हिंदी भाषेमध्ये याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडीओ अगदी काही दिवसांपूर्वीचा असल्याने आम्ही गूगल कीवर्ड सर्च करून, तसेच या घटनेशी संबंधित व्हिडीओ आणि बातम्यांचे रिपोर्ट्स तपासून आमचा तपास सुरू केला.

त्यावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] प्रोफाइलवरून हा व्हिडीओ शेअर झाला असल्याचे आम्हाला आढळले :

या व्हिडीओमध्ये नीट पाहिले तर समुद्रात काही होड्या दिसत आहेत.
एका विशिष्ट कीफ्रेममध्ये लोकंदेखील पंतप्रधानांकडे बघून हात हलवताना, त्यांना हात दाखवताना दिसत आहेत.

पीएमओच्या [PMOIndia] एक्स हँडलवरूनही एका पोस्टमध्ये, पुलाच्या उद्घाटनापूर्वी अरबी समुद्रात अनेक बोटी असल्याचे दिसत आहे.

आम्हाला आढळले की, व्हायरल व्हिडीओ मूळतः एएनआय [ANI] च्या एक्स [ट्विटर] हँडलने शेअर केला होता.

इथेही जवळपास १५ सेकंदानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोटीतील लोकांकडे बघून हात हलवताना दिसत असल्याचे आपल्याला लक्षात येते.

निष्कर्ष:

अलीकडेच सुदर्शन सेतूच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रातील माशांना हात दाखवला असल्याचा व्हायरल दावा खोटा असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी बोटीमध्ये बसलेल्या लोकांकडे बघून हात हलवत होते आणि बोटीतील लोकंदेखील पंतप्रधानांकडे पहात हात हलवताना दिसत आहेत.