९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये रोमँटिक सिनेमांची लाट आली होती. या काळात अनेक रोमँटिक चित्रपट हिट झाले. यामधील अनेक गाणी आजही चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहेत. अनेकदा चित्रपटातील गाण्यांच्या ओळी, गीताचे बोल सामान्यांना समजत नाहीत. चित्रपट सुरू असताना मध्येच येणाऱ्या गाण्यामुळे अनेकदा चित्रपटाची कथाही विस्कटते. कधीकधी गाण्यांमध्ये सुरू असलेल्या गोष्टींचा चित्रपटांशी संबंधदेखील नसतो. मोहरा चित्रपटातील अशाच एका गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

झाकीर खान नावाच्या एका विनोदी कलाकाराने मोहरा मधील ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्याचे भन्नाट पोस्टमॉर्टम केले आहे. हे विनोदी पोस्टमार्टम सध्या सोशल मिडीयावर सध्या चांगलेच चर्चेत आहे. मोहरा चित्रपटात ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे सुरू होण्याआधी चित्रपटाचा अभिनेता अक्षय कुमारला एक फोन येतो. यामध्ये एक मुलगी रात्री ८ वाजता एका इमारतीत आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळते. पोलीस निरीक्षकाच्या भूमिकेतील अक्षय कुमार ८ वाजता त्या इमारतीत पोहोचतो. मात्र त्यावेळी त्या ठिकाणी रवीना टंडन पिवळ्या साडीत डान्स करत असते. मोहरा चित्रपटातील या गाण्याची झाकीर खानने विनोदी अंगाने खिल्ली उडवली आहे.

मुलगी आत्महत्या करणार आहे म्हणून अक्षय कुमारचे वेळेवर घटनास्थळी पोहोचणे, कोणत्याही पोलिसाला सोबत न घेता पर्सनली या केसमध्ये इंटरेस्ट घेणे, पोलिसांचा गणवेश न परिधान करता कोट घालून जाणे, या सर्वच गोष्टींची या व्हिडीओमध्ये चांगलीच खिल्ली उडवण्यात आली आहे. रवीना टंडन अगदी मादक अंदाजात डान्स करत असताना अक्षयचे अगदी शांतपणे उभे राहणे, काहीच होत नसल्यासारखे दाखवणे, तरीही रवीनाचे नाचत राहणे आणि अखेर अक्षयची विकेट पडणे या सगळ्याच गोष्टींचा या व्हिडीओमध्ये समाचार घेण्यात आला आहे.

आधी आजूबाजूला काहीच घडत नसल्यासारखे दाखवणारा अक्षय कुमार नंतर मात्र अगदी मोकळेपणाने नाचू लागतो. मात्र या नाचकामात त्याला आत्महत्येची माहिती देणाऱ्या मुलीचा विसर पडतो. आत्महत्या करणार असल्याचा फोन करणारी ‘ती’ मुलगी कोण, समोर नाचत असलेली पिवळ्या साडीतील मुलगी ही तीच मुलगी आहे की ती मुलगी कोणी इतर आहे, हे कोणतेही प्रश्न पोलीस निरीक्षक असलेल्या अक्षय कुमारला पडत नाहीत, या सगळ्याची या व्हिडीओमध्ये जबरदस्त खिल्ली उडवण्यात आली आहे.

चारच दिवसांपूर्वी युट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत साडे पाच लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणात, कथानकात अनेकदा चुका होतात. त्याच चुकांवर बोट ठेवणारा आणि त्यावर खुशखुशीतपणे प्रश्न उपस्थित करणारा हा व्हिडीओ सध्या युटयूबवर चांगलाच गाजतो आहे.