बस, टॅक्सी, रिक्षाचालक संप पुकारतात त्यावेळी सर्वसामान्य प्रवाशांचे किती हाल होतात हे किमान भारतीय प्रवाशांना तरी सांगायलाच नको. मागण्या पूर्ण करण्यासाठी चालक नेहमीच प्रवाशांना वेठीस धरतात असेही आरोप अनेकदा केले जातात. अनेक प्रवाशांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो याचा अनुभवही किमान एकदा तरी प्रवासी म्हणून आपण घेतलेला असतोच. तेव्हा असे संप आपल्याला नकोसे वाटतात.

पण जपानमध्ये गेल्या आठवड्यात बस चालकांनी ज्या पद्धतीनं संप केला त्याची चर्चा सध्या होत आहे. संप म्हणजे सर्वच बंद अशा समजूतीला त्यांनी छेद दिला आहे. त्यामुळे आपल्या संपात प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेत कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. जपानमधील द रॉयबी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. या कंपनीच्या बस ज्या मार्गावरून धावतात त्याच मार्गावरून पुढील आठवड्यात प्रतिस्पर्धी कंपनीच्या बस धावणार आहे. या प्रवासाचं भाडं हे रॉयबी ग्रुपच्या बस भाड्याच्या तुलनेत कमी असणार आहे.
त्यामुळे या कंपनीच्या चालकांना अर्थात आपल्या नोकरीचा प्रश्न सतावत आहे. त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे काही सेवा सुधारण्यात येण्याची मागणी केली आहे. बसमध्ये प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवा सुधारल्या तर प्रवाशी टिकून राहतील असं कर्मचाऱ्यांनी सुचवलं. पण त्यांची मागणी धुडकावण्यात आली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीनं संप पुकारला आहे.

या कर्मचाऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवला पण बससेवा मात्र बंद पडू दिली नाही. प्रवाशांचे कोणतेही हाल होणार नाही याची काळजी घेतली पण एकाही प्रवाशांकडून तिकीटीचे पैसे घेतले नाही असं एका इंग्रजी वेबसाईटनं म्हटलं आहे. जपानी चालकांच्या या अनोख्या संपामुळे कर्मचाऱ्यांचा हेतूही साध्य झाला आणि प्रवाशांचे हालही झाले नाहीत.